मुंबई : कल्याणमधील महाराष्ट्रीय कुटुंबावरील हल्ल्याप्रकरणी पोलीस ठाण्यातील १८ आणि १९ डिसेंबर रोजीचे सीसीटीव्ही चित्रिकरण जतन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच खडकपाडा पोलिसांना दिले. महाराष्ट्रीय कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी शासकीय अधिकारी अखिलेश शुक्लासह अन्य आरोपींवर खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परंतु, पोलिसांकडून प्रकरणाचा योग्य तपास केला जात नसल्याचा आरोप करून पीडित मराठी कुटुंबाने तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे.
या हल्ल्यात जखमी झालेल्या अभिजीत देशमुख यांचा भाऊ धीरज याने पोलिसांच्या प्रकरणातील भूमिकेवर प्रश्न उपस्थित करून उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच, प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यासह आरोपींवर मोक्का लावण्याची आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याच्या विभागीय चौकशीची मागणी केली आहे. न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे ही याचिका सुनावणीसाठी आली असता खंडपीठाने त्याची दखल घेतली व सरकारसह इतर प्रतिवादींना नोटीस बजावून खडकपाडा पोलिसांना उपरोक्त आदेश दिले.
हेही वाचा…हल्ल्यातील आरोपी बराच काळ वांद्रे परिसरातच फिरत होता, सीसीटीव्हीद्वारे आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न
योगीधाम अजमेरा हाईट्स संकुलात १८ डिसेंबर रोजी शुक्ला आणि कालविकट्टे कुटुंबात उदबत्तीच्या धुरावरून झालेल्या वादात अभिजीत देखमुख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यामुळे संतापलेल्या शुक्ला यांनी त्यांच्या दहा समर्थकांकरवी देशमुख बंधूंना बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अभिजीत जखमी झाले. त्यानंतर, या प्रकरणी खडकपाडा पोलिसांत शुक्ला आणि अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला गेला.
संघटीत गुन्हेगारीचे हे प्रकरण असल्याने आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी आपण पोलिसांकडे केली होती. परंतु, पोलिसांनी त्यादृष्टीने काहीच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे, पोलीस उपायुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण संपर्क साधला, त्यांनी तपास अधिकाऱ्यांना जबाब नोंदवण्याचे आदेश दिले. तथापि, त्यानंतरही आरोपींवर मोक्का लावण्यात आला नसल्याचे याचिकेत म्हटले आहे, साक्षीदारांच्या जबाबात फेरबदल केल्याचा आणि फरारी आरोपींचा शोध लावण्यात पोलीस अपयशी ठरल्याचा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला. अखिलेश शुक्ला, त्यांची पत्नी गीता आणि इतरांसह सात जणांना अटक करण्यात आली. दुसरीकडे, शुक्ला आणि त्यांच्या पत्नीनेही देशमुख कुटुंबीयांविरोधात तक्रार नोदवली होती.