मुंबई : महाराष्ट्रासह गुजरातमध्ये बंदी असतानाही गोमांसाची वाहतूक केल्याचा आरोपाप्रकरणी मुंबईतील एका ६४ वर्षांच्या व्यावसायिकाला अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. याचिकाकर्त्यांकडून सुमारे १,०६५ किलो गोमांस हस्तगत करण्यात आल्याचा आरोप असून त्यादर्भात पुरेसे पुरावे असल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होते. त्यामुळे, प्रकरणातील सर्व पैलूंच्या चौकशीसाठी याचिकाकर्त्याची कोठडी आवश्यक आहे. शिवाय, प्रकरणाच्या या टप्प्यावर याचिकाकर्त्याला अटकेपासून संरक्षण दिल्यास त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो. ही बाब विचारात घेता याचिकाकर्त्याला अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठाने याचिकाकर्त्याला अटकेपासून दिलासा नाकारताना नोंदवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तत्पूर्वी, आपल्याला या प्रकरणी गोवण्यात आले असून आपल्याविरोधातील सर्व आरोप हे अर्थहीन आहेत. त्याचप्रमाणे, वाहन आणि गोमांस आधीच जप्त करण्यात आले असल्याने आपल्या अटकेची आणि चौकशीची आवश्यकता नसल्याचा दावा याचिकाकर्त्याच्या वतीने करण्यात आला. दुसरीकडे, याचिकाकर्त्याचा गुन्ह्यात समावेश असल्याचे पुरेसे पुरावे पोलिसांकडे आहेत. तसेच, तपास प्राथमिक टप्प्यात असून अशावेळी याचिकाकर्त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने त्याच्याकडून तपासात अडथळे निर्माण केले जाण्याची शक्यता आहे. याआधीही याचिकाकर्त्याविरोधात अशाचप्रकारचे तीन गुन्हा दाखल करण्यात आले होते, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले व याचिकाकर्त्याची याचिका फेटाळण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

हेही वाचा : मुंबई : उपनगरात गारवा…

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, २९ जुलै २०२४ रोजी एक गोमास असलेला टेम्पो संगमनेरहून मुंबई महामार्गाने अहमदाबादला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अहमदाबाद महामार्गावरील अजित पॅलेस हॉटेलजवळ सापळा रचला होता. या महामार्गावरून सायंकाळी ५.५० वाजता जात असल्याचे पोलिसांनी हेरले. तसेच, टेम्पो थांबविण्याचा प्रयत्न केला. या टेंम्पोसह एक स्कोडा गाडीही अहमदाबादच्या दिशेने चालली होती. परंतु, टेम्पो थांबवला गेल्याने स्कोडा चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

हेही वाचा : मुंबई: गोवंडीत बनावट नोटांसह एकाला अटक

त्यानंतर, या प्रकरणाची काशिमीरा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून टेम्पो आणि त्यातील दोन प्रवाशांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात एक पशुवैद्यकीय अधिकारी आणि साक्षीदारांना बोलावण्यात आले. त्यांनी वाहनातील गोमांस न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील चाचणीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीत संगमनेर येथील अकीन हारुण कुरेशी व फरहान गफार कुरेशी या दोघांनी यामीन कुरेशी याला गोमांसाची वाहतूक व वितरण करण्यास सांगितल्याचे उघड झाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai high court no pre arrest bail businessmen beef transportation case mumbai print news css