शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांना झालेल्या मारहाण प्रकरणी सिंधुदुर्गात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये भाजपा आमदार नितेश राणे यांचाही समावेश आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. म्हणूनच राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली. यावर गुरुवारी (१३ जानेवारी) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने निकाल राखून ठेवलाय. हा निर्णय सोमवारी (१७ जानेवारी) सुनावण्यात येणार आहे. तोपर्यंत न्यायालयाने नितेश राणेवर कोणतीही कारवाई करण्यास मनाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याआधी नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, हा अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला. यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

काय आहे प्रकरण?

गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून आलं. नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात देखील या प्रकरणाचे पडसाद दिसून आले. शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते संतोष परब यांनी आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच, आपल्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीने नितेश राणेंचं नाव घेतल्याचं देखील त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. त्यामुळे संतोष परब यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या तक्रारीत नितेश राणेंचं नाव देखील आलं आहे.

हेही वाचा : आमदार नितेश राणेंना न्यायालयाचा झटका; अटकपूर्व जामीन फेटाळला!

या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, दोन दिवसांच्या सुनावणीनंतर तिसऱ्या दिवशी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यासंदर्भात नितेश राणेंच्या वकिलांनी माहिती दिली आहे.

अर्ज का फेटाळण्यात आला?

दरम्यान, अटकपूर्व जामीन अर्ज का फेटाळण्यात आला, याविषयी देखील त्यांनी माहिती दिली आहे. “अद्याप न्यायालयाच्या आदेशाची प्रत आमच्याकडे आलेली नाही. मात्र, नितेश राणेंचे मोबाईल ताब्यात घेण्यासाठी कोठडी मिळणं आवश्यक असल्याचं न्यायाधीशांनी डाएसवरून सांगितलं”, असं ते म्हणाले.

नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करणार नाही, ठाकरे सरकारची हायकोर्टात हमी

याआधी राज्य सरकारने नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर सुनावणी होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कठोर कारवाई करणार नसल्याची हमी उच्च न्यायालयात दिली होती. मात्र नितेश हेच या प्राणघातक हल्ल्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांचा आरोप असून हा दावा सिद्ध करणारे तपशीलवार प्रतिज्ञापत्र सादर करु असंही नमूद करण्यात आलं होतं.

आदित्य यांची नक्कल केल्यानेच खोटय़ा प्रकरणात गोवले ; नितेश राणे यांचा दावा

विधिमंडळाबाहेर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवल्याने आणि सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहभागी होण्यापासून रोखण्याच्या हेतूने आपल्याला लक्ष्य केले जात आहे. तसेच खोटय़ा प्रकरणात गोवण्यात आले आहे, असा दावा नितेश यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या याचिकेत केला आहे. अ‍ॅड. संग्राम देसाई यांच्यामार्फत नितेश यांनी ही याचिका केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai high court on bail petition of bjp mla nitesh rane in attempt to murder case pbs