मुंबई : शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी तसेच कबीर कला मंचच्या सदस्य ज्योती जगताप यांना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन देण्यास नकार दिला. त्यांच्या विरोधातील आरोप सकृतदर्शनी खरे असल्याची टिपण्णीही न्यायालयाने केली.नियमित जामीन नाकारणाऱ्या विशेष न्यायालयाच्या आदेशाला जगताप यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
हेही वाचा : साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?
न्यायमूर्ती अजय एस गडकरी आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने सोमवारी जगताप यांची जामीन याचिका फेटाळली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जगताप यांच्यावर ठेवलेल्या आरोपांत सकृतदर्शनी सत्यता आढळते. त्यामुळे जगताप यांची जामिनाची मागणी फेटाळत असल्याचे न्यायालयाने म्हटले.
विशेष न्यायालयाने फेब्रुवारीमध्ये जगताप यांच्यासह चार आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले होते. विशेष न्यायाधीश दिनेश ई कोथळीकर यांनी दिल्ली विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक हानी बाबू आणि कबीर कला मंच या सांस्कृतिक गटाचे तीन सदस्य सागर गोरखे, रमेश गायचोर आणि जगताप यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. हे आरोपी ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेच्या कार्यक्रमाचा भाग होते.
पोलिसांच्या चकमकीत ठार झालेला आरोपी मिलिंद तेलतुंबडे याने कबीर कला मंचच्या तीन सदस्यांशी या कार्यक्रमात चर्चा केली होती. या तिघांच्या आणि अन्य व्यक्तींच्या मदतीने कार्यक्रमात माओवादी विचारसरणीचा प्रसार करण्यात आला, असा आरोप एनआयएने केला होता. या चौघांना एनआयएने २०२० मध्ये अटक केली आहे.