१७ सप्टेंबर रोजी मुंबईत मटण विक्री सुरू; कत्तलखाने मात्र बंद राहणार
जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वकाळात राज्य सरकारतर्फे १७ सप्टेंबर रोजी घालण्यात आलेली मांसविक्रीवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने सोमवारी उठवली. मात्र त्याचवेळी न्यायालयाने कत्तलखाने बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप केलेला नाही. तसेच हा निर्णय केवळ मुंबई पालिकेपुरताच मर्यादित असल्याचे स्पष्ट केल्याने पर्युषणच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी मुंबईकरांना मांस खाता येणार आहे.
मांसविक्रीवर बंदी घालण्याच्या राज्य सरकार व पालिकेच्या निर्णयाविरोधात मुंबई मटण विक्रेता संघटनेने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने पालिकेला धारेवर धरल्यावर पालिकेने १० आणि १३ सप्टेंबर रोजी घातलेली बंदी मागे घेतली. त्यामुळे राज्य सरकारने घातलेल्या १७ सप्टेंबरच्या बंदीबाबत न्यायालय सोमवारी निर्णय देणार होते. न्यायमूर्ती अनुप मोहता आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने मटण विक्रेता संघटनेची याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेत १७ सप्टेंबरला मांसविक्रीवर घातलेली बंदी उठवली. मात्र त्याचवेळी कत्तलखाने बंद ठेवण्याच्या सरकारी निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
सरकारच्या परिपत्रकात कत्तलखाने बंद ठेवण्याचे स्पष्ट नमूद केलेले असताना मांसविक्री बंदीचा नामोल्लेखही नसल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. याप्रकरणी जनभावना काय आहेत किंवा राजकीय गोष्टींचा विचार आमच्यादृष्टीने महत्त्वाचा नाही. कायद्यात काय तरतुदी आहेत, त्याची अंमलबजावणी होते की नाही, हे आमच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे आणि त्याच चौकटीत राहून आम्ही निर्णय घेत असल्याचा टोलाही न्यायालयाने हाणला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा