मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबर विडंबनात्मक गाणे सादर केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याप्रकरणी उच्च न्यायालयाने विनोदकार कुणाल कामरा याला शुक्रवारी अटकेपासून दिलासा दिला. गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी कामरा याने केलेली याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेताना कामराविरोधातील तपास सुरू ठेवावा, परंतु, याचिका प्रलंबित असेपर्यंत कामरा याच्यावर अटकेची कारवाई केली जाऊ नये. तसेच, चेन्नई येथे जाऊन त्याचा जबाब नोंदवण्यात यावा, असे आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिले.
कुणाल कामराने सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे) कार्यकर्त्यांनी मुंबईतील खारमधील स्टुडिओची मोडतोड केली होती. तसेच, आमदार मुरजी पटेल यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे खार पोलिसांनी कामराविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी कामरा याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, आपल्या जीवाला धोका असल्याने आपला जबाब दूरचित्रसंवादाच्या माध्यामातून (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) नोंदवण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती सांरग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने त्याच्या याचिकेवर शुक्रवारी निकाल देताना त्याची याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली. तसेच, याचिका प्रलंबित असेपर्यंत कामरावर अटकेची कारवाई करू नये आणि चेन्नई येथे जाऊन तेथील पोलिसांच्या सहकार्याने कामरा याचा जबाब नोंदवण्याचेही न्यायालयाने कामरा याला अटकेपासून दिलासा देताना स्पष्ट केले. पोलिसांनी प्रकरणाचा तपास पुढे सुरू ठेवावा. तसेच, याचिका प्रलंबित असताना आरोपपत्र दाखल केले गेल्यास संबंधित कनिष्ठ न्यायालयाने कामराविरोधात कोणतीही कारवाई करू नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
कामरा याच्या याचिकेवर प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती कोतवाल आणि न्यायमूर्ती मोडक यांच्या खंडपीठाने निकाल राखून ठेवला होता. त्यावेळी देखील खंडपीठाने कामरा याला भारतीय नागरिक सुरक्षा कायद्याच्या कलम ३५ (३) अंतर्गत समन्स पाठवण्यात आल्याचे नमूद केले होते. या कलमानुसार, अटकेची कारवाई करणे पोलीस अधिकाऱ्याला आवश्यक वाटत नाही. परंतु, दखलपात्र गुन्हा घडल्याचा संशय असू शकतो. तसेच, कामरा याला मुंबईत आल्यास त्याच्यावर हल्ला होण्याची भीती आहे. त्यामुळे, प्रकरणाचा तपास करणारे खार पोलीस तो गेल्या पाच वर्षांपासून राहत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांचे म्हणणे नोंदवू शकतात, थोडक्यात, खार पोलीस तामिळनाडू पोलिसांची याप्रकरणी मदत घेऊ शकतात आणि तामिळनाडूमध्ये कामरा यांचे म्हणणे नोंदवू शकतात, असेही न्यायालयाने म्हटले होते.
तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयानेही भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचे महत्त्व वेळोवेळी विविध निकालांद्वारे अधोरेखित केले आहे. तथापि, कामरा याच्या गाण्यामुळे दोन राजकीय पक्षांमध्ये शत्रुत्व निर्माण होईल. या कारणास्तव तक्रार दाखल केल्याचा दावा तक्रारकर्ते आमदार मुरजी पटेल यांनी केला आहे. परंतु, कामरा याने ज्यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर केले, त्या राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केलेली नाही, असे वरिष्ठ वकील नवरोज सिरवई यांनी युक्तिवादाच्या वेळी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला होता. दुसरीकडे, कामरा याला शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांकडून अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यानंतरही त्याने चौकशीसाठी वैयक्तिकरीत्या उपस्थित राहण्याचा पोलिसांचा आग्रह असून त्याचसाठी त्यांनी कामरा याला तीनवेळा समन्स बजावल्याचा दावाही सिरवई यांनी केला होता. कामरा हा दूरचित्रसंवाद प्रणालीद्वारे (व्हिडीओ क़ॉन्फरन्सिंग) पोलिसांना सहकार्य करण्यास तयार असताना त्याच्या वैयक्तिक उपस्थितीची पोलिसांची मागणी अतार्किक असल्याचेही सिरवई यांनी न्यायालयाला सांगितले होते. तसेच, संविधान अस्तित्त्वात आल्याच्या ७५ वर्षांनंतरही कायद्याची अंमलबजावणी कऱणाऱ्या यंत्रणा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांबाबत अनभिज्ञ आहेत किंवा त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे यातून दिसून येते, असा युक्तिवाद सिरवई यांनी केला होता.
कामराचे गाणे विशिष्ट व्यक्तीला लक्ष्य करण्यासारखे
दखलपात्र गुन्हा केला जातो, तेव्हा संविधानाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर होत नाही. तसेच, कामरा याने सादर केलेले विंडबनात्मक गाणे हे विशिष्ट व्यक्तीला लक्ष केल्यासारखेच होते. थोडक्यात, विनोदी टीका आणि लक्ष्य करणे यात फरक असून कामरा याने आपल्या गाण्यातून एका व्यक्तीला लक्ष्य केले होते. त्यामुळे, त्याचे ते गाणे विनोदी टीकेच्या श्रेणीत येत नसल्याचा दावा सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी कामराच्या याचिकेला विरोध करताना केला होता. एखादा हास्यकलाकार स्टँड अप कॉमेडीच्या माध्यमातून टीका करतो, तेव्हा ती टीका विनोदी टीकेच्या श्रेणीत येते. परंतु, एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करता तेव्हा ते विनोदी टीकेच्या श्रेणीत येत नाही. तर ते त्या व्यक्तीला लक्ष्य केल्यासारखे असते. कामरा याला त्याने केलेल्या टीकेचे परिणाम माहीत होते. त्याने गाण्यातून हेतूतः भाष्य केले होते. कामरा हा सुशिक्षित आणि सुजाण नागरिक आहे. असे असले तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणीही एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करू शकत नाही आणि त्याची प्रतिष्ठा मलिन करू शकत नाही, असेही वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला होता.
कामराच्या गाण्याने शिंदे यांची प्रतिमा मलिन
कामरा याच्या विनोदाने शिंदे यांची प्रतिष्ठा मलिन केली गेली. कामरा याला एखाद्याची प्रतिमा मलिन करण्याचा अधिकार आहे, तर राजकीय व्यक्तीला नाही का, अशी विचारणाही वेणेगावकर यांनी केली होती. विडंबनाच्या नावाखाली समाजात एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा मलिन करण्याचा आणि त्याच्या दिसण्यावरून त्याला लक्ष्य करण्याचा कुणाला अधिकार नाही. असे करणारा कायद्याच्या तावडीतून सुटू शकत नाही. कामरा याच्या गाण्याच्या चित्रफितीमुळे समुदायामध्ये द्वेष निर्माण झाला आहे. लाखो सदस्य असलेला आणि समान विचारसरणी असलेला राजकीय पक्ष हा समुदाय असल्याचेही वेणेगावकर यांनी कामरा याची याचिका फेटाळण्याची मागणी करताना स्पष्ट केले होते.