मुंबई : माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार महेश सांवत यांच्या निवडणुकीला शिवसेनेच्या (शिंदे गट) सदा सरवणकर यांनी निवडणूक याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांच्या याचिकेची दखल घेऊन सावंत यांना समन्स बजावले आणि सरवणकर यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
सावंत यांनी त्यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेल्या फौजदारी खटल्यांची माहिती उघड केली नाही, ती लपवून ठेवली आणि मतदारांची दिशाभूल केली, असा आरोप सरवणकर यांनी याचिकेद्वारे केला आहे. तसेच, गुन्हे दाखल असल्याची माहिती लपवणे हे सावंत यांना अपात्र ठरवण्यासाठी आणि २०२४ च्या माहीम विधानसभा निवडणुकीचे निकाल रद्द करण्यासाठी पुरेसे कारण असल्याचा दावाही सरवणकर यांनी केला आहे. न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठासमोर सरवणकर यांची निवडणूक याचिका शुक्रवारी सुनावणीसाठी आली. त्यावेळी, एकलपीठाने सावंत यांना समन्स बजावून सरवणकर यांनी केलेल्या आरोपांबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, माहीम विधानसभा मतदारसंघातील निवडणूक शिंदे गट, ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी (मनसे) प्रतिष्ठेची ठरली होती. शिंदे गटाचे सदा सरवणकर, ठाकरे गटाचे महेश सावंत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांच्यात येथे तिरंगी लढच रंगली होती. त्यावेळी, महायुतीतील अंतर्गत संघर्षही दिसून आला होता. भाजपा नेत्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उघडपणे सरवणकर यांना माघार घेण्यास सांगितले होते. नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, सरवणकर हे अमित यांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. परंतु, ठाकरे कुटुंबियांनी त्यांना भेटण्यास नकार दिल्याचे म्हटले गेले होते, त्यानंतर, सरवणकर यांनीही माघार घेण्यास नकार दिला. तथापि, सावंत यांनी माहीम मतदारसंघातून ५०,२१३ मतांनी विजय मिळवला, तर सरवणकर यांना ४८,८९७ मते मिळून ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले व अमित ठाकरे यांना ३३,०६२ मते मिळाली होती.