मुंबई : मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणे जलमय झाली. पहाटेच्या भरतीने शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. दरम्यान, आज दुपारी १ वाजून ५७ मिनिटांनीही समुद्राला मोठी भरती येणार आहे. या कालावधीत सुमारे ४.४० मीटरच्या उंच लाटा उसळणार आहेत. तसेच, हवामान विभागाने आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. भरतीच्या कालावधीत जोरदार पाऊस झाल्यास मुंबईची वाहतूक सेवा कोलमडण्याची शक्यता आहे.
मुंबईत रविवारी मध्यरात्री १ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत सुमारे ३०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. जोरदार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भाग जलमय झाले. तसेच, वाहतूक सेवाही विस्कळीत झाली. सकाळी कार्यालयात निघालेल्या नोकरदारांची प्रचंड तारांबळ उडाली. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, महापालिका प्रशासनाने महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या तसेच दुसऱ्या सत्रासाठी सुटी जाहीर केली. दरम्यान, आज, सोमवारी दुपारी १ वाजून ५७ मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार असून सुमारे ४ मिटरपर्यंत उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. रात्री ८ वाजून तीन मिनिटांनी भरतीचा जोर कमी होणार असून समुद्राच्या लाटाही शांत होणार आहेत. मात्र, भरतीच्या कालावधीत जोरदार पाऊस झाल्यास मुंबईची पुन्हा तुंबई होण्याची दाट शक्यता आहे.
आवश्यकता नसल्यास कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रविवारी मध्यरात्री बरसलेल्या मुसळधारांनी कुर्ला येथील एलबीएस मार्ग, शिवसृष्टी, सुधा जंक्शन, विनोबा भावे नगर, दहिसर सबवे, अंधेरी सबवे, गांधी मार्केट, संगम नगर, टिळक मार्ग, नेताजी पालकर मार्ग, गुलमोहर इर्ला जंक्शन, आकृती मॉल, दादर, शीव, मालाड येथील साईनाथ सबवे, घाटकोपर, चुनाभट्टी, शीतल तलाव, गोवंडी, मानखुर्द स्थानक परिसर जलमय झाला. परिणामी, वाहतूक सेवा ठप्प झाली. दरम्यान, नोकरदारांचे प्रचंड हाल झाले. पावसाळ्यात पाणी साचून मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, जुलैमधील पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याने पालिकेच्या कारभाराबाबत प्रश्न उभे राहत आहेत.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांत मिळून एकूण ३९ ठिकाणी झाडे, फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. तसेच, पूर्व उपनगरात एकूण ९ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. दरम्यान, एका ठिकाणी घराचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली. दुर्घटनेची माहिती मिळताच पालिकेकडून तात्काळ घटनास्थळी मदतकार्य पोहोचविण्यात आले. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास विक्रोळी पार्क साईटच्या सोमेश्वर मंदिरानजिक डोंगरावरील माती सरकली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संबंधित भागातील रहिवाशांना स्थलांतरित करण्यात येत आहे.