मुंबईतल्या जुहू या ठिकाणी मिहीर शाह याने मद्यप्राशन केलं. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवत त्याने दोघांना धडक दिली. कावेरी नाखवांना त्याने फरपटत नेलं. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. नाखवा कुटुंबावर यानंतर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशात ज्या बारमध्ये मिहीर शाह गेला होता त्या ग्लोबल बारवर हातोडा चालवण्यात आला आहे. जुहूत ग्लोबल हा बार आहे याच ठिकाणी मिहीर आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारवर चालला हातोडा

ग्लोबल बारच्या बाहेरचं बांधकाम बेकायदेशीर असल्याची माहिती समोर आली. ज्यानंतर या बार बाहेर असलेली शेड पाडण्यात आली. पालिकेने हे पाडकाम केलं. मिहीर शाह हा याच बारमध्ये आला होता. या बारमधून बाहेर पडला. त्याने नंतर बीएमडब्ल्यू कार चालवत एका महिलेला उडवलं. कावेरी नाखवा यांचा या घटनेत मृत्यू झाला. मुंबईतल्या जूहू भागात ग्लोबल बार आहे. या बारवर कारवाई करण्यात आली.

मिहीर शाहला अटक

वरळी येथे बीएमडब्ल्यू या अलिशान कारने ४५ वर्षीय महिलेला धडक देऊन तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मिहीर शाहला पोलिसांनी विरार येथून ९ जुलै रोजी सायंकाळी अटक केली. अपघात झाल्यानंतर त्याने पलायन केले होते. गेले तीन दिवस पोलीस त्याच्या मागावर होते. परंतु, त्याचा फोन बंद असल्याने त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. परंतु, गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या शोधमोहिमेनंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर त्याची आई आणि दोन मोठ्या बहिणांनीही मुरबाड येथून ताब्यात घेण्यात आलं आहे.

आदित्य ठाकरेंनी घेतली नाखवा कुटुंबाची भेट

दुसरीकडे आजच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी नाखवा कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी नाखवा कुटुंबाने त्यांना आपलं म्हणणं मांडलं. आमच्या घरातली महिला गेली आहे आम्ही आता कसं जगायचं असं म्हणत त्यांनी आक्रोश केला. आदित्य ठाकरेंनी नाखवा कुटुंबाला दिलासा दिला. तसंच दोषींवर कारवाई करण्यात येईल असंही सांगितलं. ज्यानंतर आदित्य ठाकरेंनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी ग्लोबल बारवर कारवाई करण्यात आल्याचं आदित्य ठाकरेंना सांगण्यात आलं. ज्यावर आदित्य ठाकरे म्हणाले बुलडोझर चालवायचा असेल तर मिहीरच्या घरावर चालवा असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- अपघातानंतर मिहीर शाहकडून ओळख लपवण्याचा प्रयत्न? पोलिसांना चकवा देण्याकरता शक्कल!

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

मी नाखवा कुटुंबाला भेटलो. त्यांचं सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नव्हते. मन हेलावून गेलं आहे. अपघात होत असतात पण ही तर हत्या आहे. या कुटुंबाच्या मनात राग आहे. इतकी भयंकर गोष्ट मुंबईत होते? नरकातून राक्षस आला तरीही असं होत नाही. मिहीर शाह थांबला असता तरीही कावेरी शाह वाचल्या असत्या. कोळीवाड्यात त्याला सोडा पाच मिनिटांसाठी. मिहीर राजेश शाह राक्षस आहे. ६० तासांनी त्याला अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज आहे, त्याला लपू कसं का दिलं? आपलं गृहखातं काय करतं आहे? आता मिहीर शाहला शिक्षा काय होतं ते पाहणं महत्त्वाचं आहे. मिहीर शाहच्या घरावर बुलडोझर कधी चालणार? असाही सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai hit and run case aditya thackeray meets nakhwa family today and gave reaction on mihir shah scj