राज्यात हिट अँड रन अपघाताची प्रकरणे वारंवार घडत आहेत. आज पहाटे वरळीतील ॲट्रिया मॉलजवळ भीषण अपघात घडला. एका BMW वाहनाने दुचाकीवर मासळी घेऊन चाललेल्या वरळी कोळीवाड्यातील नाखवा दाम्पत्याला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिला १०० मीटरपर्यंत फरफटत गेल्या. त्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर बीएमडब्लू वाहन हे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांच्या मालकीचे असल्यामुळे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यानंतर विरोधकांनी पीडितांना न्याय देण्याची मागणी करत शिवसेना शिंदे गटावर टीका केली. आता या प्रकरणात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

माध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या अपघातानंतर माझी पोलिसांशी चर्चा झाली. कायद्यासमोर सर्वच समान असतात. सरकार सर्वच घटनांना एकसमान पाहते. ही घटना काही वेगळी नाही. आम्ही कुणालाही वाचविण्याचे काम करणार नाही. घडलेली घटना अतिशय दुःखद आहे. असे अपघात पुन्हा घडू नये, असा सरकारचा प्रयत्न असेल. कायद्यानुसार आरोपींवर कारवाई केली जाईल.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळी पोलीस ठाणे गाठून पोलिसांकडून माहिती घेतली. तसेच पीडित नाखवा कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावरही मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, विरोधकांचे कामच विरोध करणे आहे. पण आमचे सरकार कुणालाही पाठिशी घालणार नाही. तो आमचा पदाधिकारी असला तरी सर्वांना समान न्याय लागू करण्याचे काम आम्ही करू.

दरम्यान आदित्य ठाकरे यांनी वरळी पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती घेतल्यानंतर माध्यमांशी संवाध साधला. ते म्हणाले, “आज सकाळी वरळीत हिट अँड रनची घटना घडली. या घटनेतील आरोपी चालक फरार आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजही जप्त करण्यात आले आहे. या घटनेतील जो तरुण आरोपी आहे, त्याला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आम्ही केली आहे.”

“या घटनेतील आरोपी कोणत्याही पक्षाचा असला, तरी मी या घटनेचे राजकारण करणार नाही. मी या घटनेला राजकीय रंग देणार नाही. माझी मागणी आहे की, जो गाडी चालवत होता, त्या आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे. या घटनेत कुठलाही राजकीय हस्तक्षेप व्हायला नको”, अशी अपेक्षाही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

अपघात कसा घडला?

वरळीतील ॲट्रिया मॉलजवळ पहाटे ५.३० वाजता अपघात घडला. मॉलजवळच असलेल्या वरळी कोळीवाड्यात नाखवा दाम्पत्य राहत असून ते सकाळी ससून डॉक येथे मासे विकत घेण्यासाठी गेले होते. मासे घेऊन घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या बीएमडब्लू वाहनाने धडक दिली. दुचाकीवर मासळी असल्यामुळे दुचाकी चालवत असलेल्या नाखवा यांचे दुचाकीवर नियंत्रण सुटले. त्यामुळे पती-पत्नी वाहनाच्या बोनेटवर धडकले. वाहनाने ब्रेक मारल्यानंतर नाखवा बाजूला पडले. मात्र त्यांच्या पत्नीला वेळीच बाजूला होता आले नाही. त्यातच बीएमडब्लूच्या चालकाने वाहन पळविल्यामुळे त्या वाहनाबरोबर १०० मीटरपर्यंत फरफटत गेल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai hit and run case cm eknath shinde first reaction after speeding bmw rams into bike in worli kvg
Show comments