मुंबई हिट अँड रन प्रकरणात गेल्या दोन दिवसांत अनेक खुलासे समोर आले आहेत. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये कावेरी नाखवा नावाच्या ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिचे पती प्रदीप नाखवा हे जखमी झाले आहेत. आत्तापर्यंत पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांना अटक केली असून त्यांचा मुलगा व या प्रकरणातला मुख्य आरोपी मिहीर शाह फरार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यात आता मिहीर शाहनं अपघातापूर्वी काय काय केलं होतं, याचा तपशील उघड होत आहे. त्या आधारावर आता राजेश शाह यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
नेमका कसा झाला अपघात?
प्रदीप नाखवा व त्यांच्या पत्नी कावेरी नाखवा रविवारी पहाटे क्रॉफर्ड मार्केटमधून विक्रीसाठी मासळी घेऊन परत येत होते. बाईकवरून जात असताना मागून एका आलिशान बीएमडब्ल्यू कारनं त्यांना जोरात धडक दिली. प्रदीप नाखवा बाईकसह रस्त्यावर कोसळले तर कावेरी नाखवा हवेत उडाल्या आणि थेट बीएमडब्ल्यू कारच्या बॉनेटवर आदळल्या. ही कार तशीच पुढे दोन किलोमीटर गेली. अखेर कावेरी नाखवा कारवरून खाली पडल्या आणि कार भरधाव वेगानं वांद्रे-वरळी सीलिंकवरून निघून गेली. कावेरी नाखवा रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलं.
भरधाव वेगानं जाणाऱ्या बीएमडब्ल्यूमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा २४ वर्षीय मुलगा मिहीर शाह ड्रायव्हिंग सीटवर होता असं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर मिहीर शाह फरार असून त्याच्यासाठी पोलिसांनी लुकआऊट नोटीसही काढली आहे.
आधी मर्सिडीज, मग बीएमडब्ल्यू!
दरम्यान, शनिवारी पहाटे अपघात करण्यापूर्वी मिहीर शाहनं मित्रांसोबत मुंबईतल्या एका पबमध्ये पार्टी केली होती, अशी माहिती आता समोर येऊ लागली आहे. या पबमधून बाहेर निघतानाचं सीसीटीव्ही फूटेज आता पोलिसांच्या हाती लागलं असून त्यात एका पांढऱ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये मिहीर शाह त्याच्या मित्रांसोबत बसत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आधी मर्सिडीज कारमध्ये बसलेल्या मिहीर शाहनं पुढे कार बदलली आणि तो बीएमडब्ल्यू कारमध्ये बसल्याचा अंदाज लावला जात आहे.
पबमध्ये पार्टी, १८७३० रुपयांचं बिल!
मिहीर शाहनं शुक्रवारी मध्यरात्री मुंबईतील ग्लोबल टोपास बारमध्ये मित्रांसोबत पार्टी केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. या पार्टीचं सीसीटीव्ही फूटेज आणि बारमध्ये मिहीर शाहनं चुकतं केलेलं बिल अशा दोन गोष्टी पोलिसांच्या हाती लागल्या असून त्याआधारे पोलीस पुढील तपास करत आहेत. या बिलावरची रक्कम तब्बल १८ हजार ७३० रुपये इतकी असल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे. बारमधून निघाल्यानंतर मिहीरनं बोरीवलीमध्ये त्याच्या मित्रांना सोडलं आणि नंतर तो तिथून निघाल्याची माहितीही समोर आली आहे.
मिहीर दारुच्या नशेत होता? सिद्ध कसं करणार?
दरम्यान, अपघातावेळी मिहीर शाह दारूच्या नशेत होता, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अपघात झाल्यापासून मिहीर शाह फरार असल्यामुळे त्याच्या रक्ताच्या नमुन्यांवरून त्यानं मद्यप्राशन केलं होतं की नाही? हे सिद्ध करणं कठीण आहे. त्यामुळे त्यासाठी आम्ही गोळा केलेले इतर पुरावे आम्ही तपासून पाहू”, अशी माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे.
मरीन ड्राईव्हवरची ‘जॉयराईड’!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिहीर आणि त्याचा कारचालक राजरिषी बिदावत हे मरीन ड्राईव्हवर लाँग ड्राईव्हसाठी आले होते. परतताना मिहीरनं राजरिषीकडे गाडी देण्याचा आग्रह धरला. नंतर मिहीरनं गाडी आपल्या हातात घेतली आणि पुढे डॉ. अॅनी बेझंट रोडवर नाखवा दाम्पत्याला जोरात धडक दिली.