मुंबईतल्या वरळी भागात रविवारी पहाटे भरधाव वेगात कार चालवत मिहीर शाह या तरुणाने कावेरी नाखवा आणि प्रदीप नाखवा या दोघांना धडक दिली. या धडकेत प्रदीप नाखवा एका बाजूला पडले. तर कावेरी नाखवांना फरपटत नेण्यात आलं. या अपघातात कावेरी नाखवांचा मृत्यू झाला. या प्रकरणातला आरोपी मिहीर शाह हा अपघात झाल्यापासून फरार होता. मिहीर शाहला आता अटक करण्यात आली आहे. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी प्रश्न उपस्थित केला आहे.
कावेरी नाखवा यांचा अपघातात मृत्यू
मुंबईतल्या वरळी भागात भरधाव वेगात बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेला चिरडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला आता अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी मिहीर शाह याला शहापूरमधून अटक केली आहे. याशिवाय मिहीरच्या आईला आणि बहिणीलाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते राजेश शाह यांचा तो मुलगा आहे. त्याच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्याला न्यायालयात हजर केलं जाईल. मात्र आता याच वैद्यकीय तपासणीचा मुद्दा उपस्थित करत जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई पोलिसांनाच सवाल केला आहे.
हे पण वाचा- मोठी बातमी! वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला अटक
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
“अपघात होऊन ६० तास उलटले आहेत. त्यानंतर आता रक्ताच्या नमुन्यांमध्ये काय मिळणार? दारु, ड्रग्ज याचे अंश मिळणार आहेत का? त्याने दर दोन तासांनी रक्त काढून चाचणीसाठी पाठवलं असेल. त्याला जेव्हा ही खात्री पटली असेल की रक्तात आता कसलेच अंश नाहीत तो पोलिसांच्या समोर गेला असेल. त्याचे रक्ताचे नमुने एकदम क्लिअर येणार आहेत. आता पोलीस काय करतील? पब आणि बार सील करुन काय होणार आहे? ज्या मुलाने धडक दिली त्याला सोडून तुम्ही बारचालकांना कशाला त्रास देत आहात? प्रमाणाबाहेर दारु पिणारा हा मुलगा एका महिलेच्या मृत्यूसाठी जबाबदार आहे. कायदेशीर कारवाई करुन त्याला शिक्षा द्या. बार बंद करुन काय होणार आहे? बार चालवणाऱ्या माणसाने जबरदस्तीने मिहीर शाहला दारु पाजली होती का? त्याच्याकडून चूक झाली, त्याने धडक दिली त्यानंतर थांबायला हवं होतं. कदाचित त्या महिलेचा जीव वाचला असता. एखादी छोटीशी केस त्याच्याविरोधात झाली असती. मात्र इतकं मोठं प्रकरण झालं नसतं. एका माणसाचं घर उद्ध्वस्त झालं. ज्यांचा मृत्यू झाला त्या महिला मासे विक्री करत होत्या. त्यांच्याबाबत संवेदनशीलता उरलेली नाही. माझा बाप माझ्या पाठिशी आहे मग मी का घाबरु? अशी मानसिकता दिसते आहे. आता साठ तासांनी पोलीस काहीही करु शकत नाही. बिचारी महिला जिवानीशी गेली. पुढे जाऊन हेच सांगितलं जाणार आहे की मिहीर शाह कार चालवतच नव्हता.” असं आव्हाड म्हणाले.
नेमका अपघात कसा झाला?
हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह रात्री जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन करत होता. त्यानंतर तो गोरेगावला गेला. घरी गेल्यानंतर त्याने त्याच्या चालकाला सांगितलं की आपल्याला लाँग ड्राईव्हवर जायचं आहे. प्रवासादरम्यान तो मुंबईतल्या वरळी भागात आला. त्यानंतर पुन्हा गोरेगावला जायला निघाला. गोरेगावला जाताना मिहीर शाह स्वतः कार चालवत होता असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. तसंच जो अपघात झाला तो एट्रिया मॉलजवळ झाला. तिथपासून त्याने कावेरी नाखवा यांना फरपटत नेलं. हा अपघात झाला तेव्हा मिहीरने मद्यप्राशन केलं होतं. मिहीर शाह फरार होता. मात्र त्याला अटक करण्यात आली. आता जितेंद्र आव्हाड यांनी यावरुन सवाल उपस्थित केले आहेत.