वरळी हिट अँड प्रकरण रविवापासून चर्चेत आहे. रविवारी पहाटे बेदरकारपणे बीएमडब्ल्यू कार चालवत मिहीर शाहने प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा यांना धडक दिली. या अपघातात प्रदीप नाखवा रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. तर कावेरी नाखवा यांना मिहीर शाहने फरपटत नेले. त्यानंतर मिहीर शाह फरार झाला. मंगळवारी त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणात आता संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे.
मिहीर शाह याला अटक
वरळी येथे बीएमडब्ल्यू या अलिशान कारने ४५ वर्षीय महिलेला धडक देऊन तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मिहीर शाहला पोलिसांनी विरार येथून ९ जुलै रोजी सायंकाळी अटक केली. अपघात झाल्यानंतर त्याने पलायन केले होते. गेले तीन दिवस पोलीस त्याच्या मागावर होते. परंतु, त्याचा फोन बंद असल्याने त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. परंतु, गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या शोधमोहिमेनंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर त्याची आई आणि दोन मोठ्या बहिणांनीही मुरबाड येथून ताब्यात घेण्यात आलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
मुंबईतलं हिट अँड रन प्रकरण हे गंभीर प्रकरण आहे. शाह कुटुंबाने मिहीरला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. राजेश शाह यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत हे लक्षात घ्या. त्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड तपासा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. राजेश शाह यांच्याकडे आलेली मालमत्ता, आलिशान कार कुठून आल्या त्याची चौकशी करा. राजेश शाह मुख्यमंत्र्याचा खास माणूस कसा का? बोरीवली पोलीस ठाण्यात जाऊन पुरावे तपासा असं संजय राऊत म्हणाले आहेत.
हे पण वाचा- Hit and Run: मिहीर शाह याच्या अटकेनंतर जितेंद्र आव्हाडांचा सवाल, “रक्ताच्या नमुन्यांत ६० तासांनी पोलीस…”
मिहीर शाह याने ड्रग्ज घेतले होते. रक्ताच्या नमुन्यांमध्ये ते ड्रग्ज येऊ नये म्हणून त्याला तीन दिवस गायब करण्यात आलं होतं. त्याला लपवून ठेवलं होतं. त्यानंतर त्याला अटक झाली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं. एका महिलेला चिरडलं आहे. माणुसकीला काळीमा फासला जाणारा हा प्रकार आहे. असा माणूस कधीही सुटायला नको. तसंच त्याला वाचवण्याचे प्रयत्न चालले आहेत. असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या राज्यातलं सरकार गुन्हेगारांना पाठिंबा देणारं सरकार आहे. अनेक गुन्हेगारांना संरक्षण देऊन हे सरकार स्थापन झालं आहे. गुन्हेगारी करणारे लोक सरकारमध्ये बसले आहेत. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या माध्यमातून गुन्हेगारांना पक्षात आणलं आहे. वरळी हिट अँड रनमध्ये हेच झालं आहे असंही संजय राऊत म्हणाले. मिहीरच्या शरीरातील नशेचा अंमल रिपोर्टमध्ये येऊ नये म्हणून त्याला तीन दिवस फरार ठेवण्यात आलं असंही संजय राऊत म्हणाले. तसंच मुंबई पोलिसांनी या मुलाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशीही मागणी संजय राऊत यांनी केली.