Ghatkopar Hoarding Collapse : मुंबईतील घाटकोपर येथे पूर्व द्रुतगती मार्गावरील एका पेट्रोल पंपावर सोमवारी (दि. १३ मे) वादळी वाऱ्यामुळे महाकाय जाहिरात फलक कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या होर्डिंगचा मालक असलेला भावेश भिंडे सध्या फरार असला तरी त्याबाबत आता नवनवीन माहिती समोर येत आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच भिंडेवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. घाटकोपरमधील होर्डिंग कोसळण्याची दुर्घटना घडल्यानंतर इगो मीडिया प्रा. लि. संचालक असलेल्या ५१ वर्षीय भावेश भिंडेवर घाटकोपरच्या पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याचवर्षी २४ जानेवारी रोजी मुंलुंड पोलीस ठाण्यात भिंडेविरोधात बलात्कार आणि विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला होता. मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांनी दिली दिलेल्या माहितीनुसार, भिंडेविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला असून या प्रकरणी आम्ही आरोपपत्रही सादर केलेले आहे.
२००९ साली निवडणूक लढविली होती
२००९ साली भिंडेने अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकही लढविली होती. तसेच अवैधरित्या फलक लावल्यामुळे त्याला आतापर्यंत मुंबई मनपाने २१ वेळा दंड ठोठावला आहे. तसेच धनादेश बाऊन्स केल्याप्रकरणी दोन गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. मुलुंड विधानसभेतून २००९ साली निवडणूक लढवित असताना भिंडेने प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यानुसार त्याच्यावर मुंबई महानगरपालिका कायदा कलम ३२८ (परवानगीशिवाय होर्डिंग लावणे) आणि कलम ४७१ (दंड) नुसार कारवाई करण्यात आलेली आहे.
होर्डिंग दुर्घटना प्रकरणी सोमवारी रात्री भावेश भिंडेवर गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय दंड विधान कलम ३०४ (सदोष मनुष्यवध), कलम ३३८ (गंभीर दुखापत), कलम ३३७ (निष्काळजीपणामुळे गंभीर दुखापत) कलम ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मनपाने सदर होर्डिंग उभारण्याची परवागनी दिलेली नाही. रेल्वेच्या जागेवर हे होर्डिंग उभे असून दुर्घटनास्थळी आणखी तीन होर्डिंग्स आहेत. यासाठी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली होती.”
बिलबोर्ड बांधणाऱ्या M/S Ego Media या एजन्सीविरुद्धही तक्रार नोंदवण्यात आली होती व बीएमसीसुद्धा त्यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल केली होती. बीएमसी जास्तीत जास्त ४० x ४० चौरस फूट होर्डिंग उभारण्याची परवानगी देते मात्र, कोसळलेले होर्डिंग १२० x १२० चौरस फूट आकाराचे होते. सध्या बीएमसी एन वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांनी एजन्सीला बीएमसीची वैध परवानगी नसल्याबद्दल त्यांचे सर्व होर्डिंग तात्काळ काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे.