सांगलीच्या एका महिलेवर मुंबईत लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. सदर महिलेने सांगलीत गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी सदर गुन्हा घाटकोपरमधील पंत नगर पोलिस ठाण्यात वर्ग केला आहे. पीडित २३ वर्षीय महिला सांगली येथे राहणारी आहे. तिच्या पतीनेच तिच्यावर आधी बळजबरीने लैंगिक संबंध ठेवले आणि त्यानंतर त्याच्या दोन मित्रांसह संबंध ठेवण्यास पत्नीला भाग पाडले.

प्रकरण काय आहे?

पोलिसांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर पूर्व येथील रमाबाई नगर कॉलनीच्या परिसरात सदर गुन्हा ९ आणि १० डिसेंबर रोजी घडला. पीडितेच्या पतीने तिला येथील एका शाळेच्या परिसरात आणून तिच्याशी इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध प्रस्थापित केले. मात्र या कृत्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकला नाही. वैवाहिक बलात्कार गुन्ह्याच्या कक्षेत येत नसल्यामुळे पोलिसांनी पतीवर या गुन्ह्याचे कलम दाखल केलेले नाही.

हे वाचा >> Photos : विवाहित असल्याचं बिंग फुटलं, सनदी अधिकाऱ्याच्या मुलाने प्रेयसीच्या अंगावर घातली गाडी

त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १० डिसेंबर रोजी पीडितेच्या पतीने तिला या परिसरात नव्याने तयार होत असलेल्या इमारतीमध्ये आणले. येथे त्याने दोन इसमांची तिची ओळख करून दिली. हे दोघेही त्याचे मित्र असल्याचे त्याने सांगितले. हे दोघेही आपल्याला या इमारतीमध्ये फ्लॅट मिळवून देणार आहेत. पण त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी द्यावे लागेल, असे आरोपी पतीने पत्नीला सांगितले.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीला घराचे भाडे भरण्यासाठी पैशांची गरज होती. यासाठी त्याने त्याच्या आरोपी मित्रांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये घेतले. याबदल्यात त्याने आपल्या पत्नीला दोघांच्या हवाली केले. पैसे घेतलेले असल्यामुळे त्याने स्वतःच्या पत्नीला त्याठिकाणी आणले होते. पतीनेच पत्नीला तावडीत दिल्यानंतर दोघांनीही आळीपाळीने पीडितेवर बलात्कार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आणखी वाचा >> सज्जन जिंदल यांच्याविरोधात अभिनेत्रीकडून बलात्काराची तक्रार दाखल

पीडितेने सांगलीत तक्रार दाखल केली

या अत्याचारानंतर सदर पीडित महिला तिच्या गावी निघून गेली. तिथे तिने तीनही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र गुन्ह्याचे ठिकाण पंतनगर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मोडत असल्यामुळे सांगली पोलिसांनी हे प्रकरण शुक्रवारी मुंबईतील पंतनगर येथे वर्ग केले. पंत नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश कवळे यांनी सांगितले, तक्रारदार पीडित महिलेचा जबाब नोंदवून घेण्यासाठी मुंबईत बोलविण्यात आले आहे. तिच्या तक्रारीनंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल.

दरम्यान सांगली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये कलम ३७६ (१) बलात्कार, ३७६ (ड) सामूहिक बलात्कार, कलम५०६ (गुन्हेगारी धमकी) आणि कलम ३४ अनुसार गुन्हा दाखल केलेला आहे.

Story img Loader