मुंबई : नोकरी सांभाळून शिक्षण घेणाऱ्यांसाठी मुंबई विद्यापीठाचे दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) नेहमीच सोयीस्कर ठरते. गेल्या ५५ वर्षांपासून सुरू असलेल्या ‘आयडॉल’मधून आजवर कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींसह लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र गेल्या दोन शैक्षणिक वर्षांपासून ‘आयडॉल’मधील विद्यार्थी संख्येचा आलेख उतरता राहिल्याचे दिसते आहे. यंदा पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विविध १६ अभ्यासक्रमांसाठी अवघ्या २४ हजार ८९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनामुळे शैक्षणिक क्षेत्र विस्कळीत होऊन ते ऑनलाइन स्वरूपात सुरू राहिले. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ आणि २०२१-२२ अंतर्गत विविध विद्याशाखांच्या परीक्षा या ऑनलाइन माध्यमातून बहुपर्यायी प्रश्न स्वरुपात घेण्यात आल्या. त्यानंतर अलीकडेच विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) विद्यापीठांना ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षण माध्यमातून विविध अभ्यासक्रम राबविण्याची परवानगी दिली. परिणामी, तासिका व परीक्षाही ऑनलाइन होत असून वेळ वाचत असल्यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांनी ऑनलाइन माध्यमातून दूरस्थ शिक्षणाचा पर्याय स्वीकारला आहे. सध्या मुंबई विद्यापीठाच्या ‘आयडॉल’मध्ये काही अभ्यासक्रमाच्याच तासिका ऑनलाइन स्वरूपात होत आहेत तर परीक्षा प्रत्यक्ष स्वरूपात होतात. त्यामुळे घटती विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन ‘आयडॉल’मध्ये ऑनलाइन शिक्षणप्रणाली कशी प्रभावी करता येईल, यावर भर दिला जात आहे.

हेही वाचा – भटक्या श्वानांना खायला घालण्यापासून रहिवाशाला रोखू नका, उच्च न्यायालयाचे नवी मुंबईस्थित गृहनिर्माण संस्थेला आदेश

‘आयडॉल’मध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ अंतर्गत ६१ हजार ११५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यानंतर जवळपास ५० टक्क्यांनी मोठी घट होऊन शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत ३२ हजार ८७३ विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश नोंदणी केली. त्यानंतर पुन्हा काही प्रमाणात घट झाली असून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत २४ हजार ८९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यात २ तृतीयपंथी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. तसेच, यापूर्वी एकच वार्षिक परीक्षा व्हायची. मात्र सध्या ‘आयडॉल’मध्ये सत्र स्वरूपात अभ्यासक्रम सुरू आहेत. एकाच वर्षात दोन सत्र परीक्षा होतात. त्यामुळे सदर परीक्षेत कोणी विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना पुन्हा ‘एटीकेटी’ची द्यावी लागते. परिणामी, नोकरी सांभाळून शिक्षण घेणाऱ्यांना पुन्हा ‘एटीकेटी’साठी कार्यालयातून सुट्टी मिळणे अवघड असते. त्यामुळे कार्यालयीन वेळ व अंशतः प्रत्यक्ष दूरस्थ शिक्षणाच्या वेळेचे गणित जमत नसल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचा ओढा हा संपूर्णतः ऑनलाईन शिक्षण केंद्रांकडे असून त्यांचा घराजवळील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्याकडे कल आहे.

हेही वाचा – मुंबईच्या तापमानात घट

‘आयडॉल’चा घटता प्रतिसाद

शैक्षणिक वर्ष : पुरुष विद्यार्थी : महिला विद्यार्थी : एकूण विद्यार्थी

२०२२-२३ : २५ हजार १५४ : ३६ हजार ९६१ : ६१ हजार ११५

२०२३-२४ : १३ हजार ८८० : १८ हजार ९९३ : ३२ हजार ८७३

२०२४-२५ : ९ हजार ५९ : १५ हजार ८३३ : २४ हजार ८९४

सध्या विद्यार्थ्यांचा कल हा ऑनलाइन माध्यमातून शिक्षण घेण्याकडे जास्त आहे. परिणामी, दूरस्थ शिक्षण माध्यमातील विद्यार्थी संख्या घटत आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण प्रणाली कशी प्रभावी करता येईल, यासाठी कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. तसेच, विविध जुने व नवीन अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्याची चाचपणी सुरु आहे.- डॉ. शिवाजी सरगर, संचालक, आयडॉल, मुंबई विद्यापीठ