आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी सादर केलेल्या रेल्वेच्या अंतरिम अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांचे लक्ष लागले असताना या अर्थसंकल्पात मुंबईसाठी खास काहीच तरतुदी नाहीत. मात्र देशभरात सुरू होणाऱ्या १७ प्रीमियम गाडय़ांपैकी ९ गाडय़ा, ३८ एक्स्प्रेस गाडय़ांपैकी ११ गाडय़ा, ६ नवीन प्रस्तावित रेल्वेमार्ग, देशभरात होणाऱ्या पाचपैकी तीन मार्गाचे दुपदरीकरण अशा तरतुदींमुळे रेल्वेमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या पदरात भरघोस दान टाकले आहे. मात्र कोकणाच्या नशिबी काहीच पडलेले नाही.
रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. रेल्वेमंत्री थोडय़ाच दिवसांपूर्वी मुंबई भेटीवर आले होते. त्या वेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन उपनगरीय प्रवाशांच्या समस्या त्यांच्या कानावर घातल्या होत्या. त्यामुळे अंतरिम अर्थसंकल्पात मुंबईच्या अनेक अपेक्षा पूर्ण होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, रेल्वेमंत्र्यांनी मुंबईकरांसाठी रोख स्वीकारणाऱ्या एटीव्हीएमचा प्रसार, मोबाइलवर अनारक्षित व उपनगरीय तिकिटे आणि जुलैपासून सुरू होणाऱ्या वातानुकूलित उपनगरीय गाडय़ा याव्यतिरिक्त काहीच घोषणा केल्या नाहीत. परळ टर्मिनस, परळ व छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत पाचव्या व सहाव्या मार्गाचे विस्तारीकरण, विकासकामांसाठी निधी, जादा गाडय़ांची खरेदी यापैकी एकही अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही.
महाराष्ट्रात सहा नवीन रेल्वेमार्गाचे प्रस्ताव आहेत. यात कराड-कडेगाव-लेणारे-खरसुंडी, बैतुल-अमरावती, मिरज-विजापूर (मार्गे कवठेमहांकाळ), पुणे-बारामती (मार्गे सासवड-जेजुरी-मोरगाव), पुणे-अहमदनगर (मार्गे केडगांव) आणि घाटनंदुर-श्रीगोंदा रोड-दौंड (मार्गे मांजरसुंभा-पाटोडा-जामखेड) या मार्गाचा समावेश आहे. लातूर रोड-कुर्डुवाडी, पुणे-कोल्हापूर आणि परभणी-परळी या मार्गाचे दुपदरीकरण होणार आहे.     

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईसाठी काय?
* जुलै महिन्यापर्यंत पश्चिम रेल्वेमार्गावर पहिली उपनगरीय वातानुकूलित गाडी धावणार
* रोख रक्कम स्वीकारणाऱ्या एटीव्हीएमचा प्रसार (तिकीट रांगा कमी करण्यासाठी)
* मोबाइलवर अनारक्षित तिकिटांची विक्री (उपनगरीय रेल्वे तिकिटांसह)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai ignored in railway budget