मुंबईतील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वादग्रस्त फतवा काढण्यात आला आहे. मांसाहारी पदार्थ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी हॉस्टेलमधील स्टीलचे ताट वापरु नये, या ऐवजी त्यांनी मासांहारी जेवणासोबत मिळणाऱ्या प्लास्टिक ट्रे प्लेट्सचा वापर करावा, असा ईमेल विद्यार्थ्यांना पाठवण्यात आला आहे. मात्र, हा ईमेल आयआयटी प्रशासनाने पाठवलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.
‘मिड डे’च्या वृत्तानुसार मुंबई आयआयटीमधील हॉस्टेलमध्ये रेग्यूलर मेन्यूमध्ये शाकाहारी जेवणच मिळते. तर मांसाहारी जेवणासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. मांसाहारी जेवण हे प्लास्टिक ट्रे प्लेटमध्ये दिले जाते. हॉस्टेल नंबर ११ मधील स्टुंडट कौन्सिलने एक ईमेल पाठवला आहे. ‘मांसाहारी जेवण घेणारे विद्यार्थी शाकाहारी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या रेग्यूलर स्टीलच्या प्लेटचा वापर करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे मांसाहारी जेवण घेणाऱ्यांनी प्लास्टिकच्याच ट्रेचा वापर करावा’ असे या ईमेलमध्ये म्हटले आहे.
हॉस्टेल नंबर ११ मधील विद्यार्थ्यांनाच हा ईमेल पाठवण्यात आला असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. मांसाहारी जेवण ज्या प्लास्टिक प्लेटमध्ये दिले जाते ते स्टीलच्या ताटापेक्षा आकाराने लहान असते, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. ‘देशातील काही महाविद्यालयांमध्ये भोजनकक्षात मांसाहारी आणि शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था असल्याचे मी ऐकून आहे. पण आयआयटीसारख्या ठिकाणी असा दुजाभाव केला जातो हे दुर्दैवी आहे’ अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्याने दिली. हा ईमेल प्रशासनाने पाठवलेला नाही. तर स्टुंडट कौन्सिलने पाठवला आहे. पण जोपर्यंत विद्यार्थी आवाज उठवत नाही तोपर्यंत प्रशासन काहीच करणार नाही, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.
हॉस्टेलच्या स्टुडंट कौन्सिलची सचिव रितीका वर्माने हा आरोप फेटाळून लावला आहे. ‘मी स्वतः मांसाहारी आहे. मला भेदभाव केल्याचे वाटत नाही. मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाकाहारी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या रेग्यूलर प्लेटचा वापर केल्याचे समोर आले. त्यामुळे काही विद्यार्थ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या. म्हणून आम्ही नियमांची आठवण करुन देण्यासाठी हा ईमेल पाठवला, असे तिने सांगितले.