मुंबई : रविवारी पहाटेपासून मुंबई, ठाण्यात पावसाच्या जोरदार धारा कोसळल्याने, अनेक सखल भागात पाणी भरण्याच्या घटना घडल्या. तसेच ठाण्यातील अनेक भागातील नदीचे पूल पाण्याखाली गेल्याने, रस्ते मार्ग बंद होऊन वाहतूक सेवेवर परिणाम झाला. तर, मध्य रेल्वेवरील कर्जत-पनवेल दरम्यान असलेल्या कर्जत-चौक दरम्यान रेल्वे रूळावर पाणी भरल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली. त्यामुळे अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले.
गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढला असून, वाहतूक सेवा विस्कळीत होण्याच्या घटना घडत आहेत. रविवारी पहाटेपासून ठाण्यात मुसळधार पाऊस पडल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. तर, अनेक नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने, अनेक गावांशी संपर्क तुटला. तर, रविवारी शहापूर, मुरबाड, बदलापूर, कर्जत याठिकाणी फिरायला गेलेल्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. रविवारी दुपारच्या सुमारास नियमित रस्ते बंद झाल्याने, परतीचा प्रवास करताना पर्यटकांची अडचण झाली. वाहतूक वळवलेल्या मार्गावरून जाताना अनेक वाहनचालकांचा गोंधळ उडाला. त्यात पावसाचा जोर वाढल्याने, रस्ते समजणे कठीण झाले होते.
हेही वाचा – ‘बँकॉक’वारी बायकोपासून लपविण्यासाठी ‘नको ते’ कृत्य केलं, आरोपी पवार पोलिसांच्या ताब्यात
रविवारी पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला होता. १५ ते २० मिनिटे लोकल सेवा उशिराने धावत होती. तसेच रविवारी सुट्टीकालीन वेळापत्रकानुसार शेकडो लोकल रद्द केल्या जात असल्याने, त्याचा फटका प्रवाशांना बसला. अनेक जलद, धीम्या लोकल या वेळापत्रकानुसार रद्द केल्या होत्या. त्यामुळे अप आणि डाऊन दोन्ही दिशेकडे जाताना प्रवाशांना विलंबयातना सहन कराव्या लागल्या. तर, जोरदार पावसामुळे रविवारी दुपारी ४.२० वाजता चौक-कर्जत दरम्यान रेल्वे रूळावर पाणी भरल्याने रेल्वे सेवा बंद करण्यात आली. तर, पनवेल-नांदेड एक्स्प्रेस आणि मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांना फटका बसला. तसेच काही मेल-एक्स्प्रेसचे मार्ग बदलले.