मुंबई : मुंबई महानगरपालिकेने यंदा पावसाळ्यात डेंग्यू आणि हिवताप, तसेच अन्य पावसाळी आजारांच्या प्रतिबंधासाठी विशेष लक्ष केंद्रीत अर्थात ‘फोकाय’ पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात डेंग्यू आणि हिवतापाचे रूग्ण मोठ्या संख्येने आढळतात. मोठ्या संख्येने रुग्ण आढळणाऱ्या विशिष्ट विभागांमध्ये या पद्धतीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

जागतिक आरोग्य संघटना आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रामार्फतही या पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेला देण्यात आले आहेत. जागतिक आरोग्य संघटना, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (दिल्ली) व मुंबई महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने नुकत्याच पार पडलेल्या कार्यशाळेत हिवताप, डेंग्यू आणि जलजन्य आजार यांचे प्रतिबंधक नियंत्रण व उपाययोजना याबाबत विशेष लक्ष केंद्रीत अर्थात ‘फोकाय’ आधारित उपचार आणि सूक्ष्म आराखडा यावर विशेष भर देण्यात आला. डासांची उत्पत्तीस्थाने शोधणे, डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करणे अशा उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याबरोबरच डेंग्यू आणि हिवताप रूग्णांची संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन करणे अपेक्षित आहे. यंदा पावसाळ्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करतानाच प्रभावीपणे फोकाय पद्धत राबवण्यात येणार आहे. एखाद्या भागात सर्वेक्षण करताना डासांच्या उत्पत्तीचा उगम शोधणे, सर्वेक्षण करणे, डेंग्यू आणि हिवतापाचे रूग्ण शोधणे आणि रूग्णांवर उपचार करणे यांसारख्या उपाययोजना यामध्ये केल्या जातील, जेणेकरून या आजारांवर पूर्णतः नियंत्रण ठेवता येईल.

हेही वाचा – मुंबई : विनयभंग करून पळणाऱ्या आरोपीला पाठलाग करून महिलेने पकडले; दोन अल्पवयीन मुलींचा केला विभायभंग

काय आहे फोकाय पद्धत

पावसाळ्यात मुंबईतील एखाद्या भागात विशिष्ठ आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळतात. त्यामुळे या विशिष्ट भागावर लक्ष केंद्रीत करण्यात येते. त्याचबरोबर संबंधित भागात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक उपाययोजनाही करण्यात येतात. त्यादृष्टीने संबंधित विभागात या पद्धतीनुसार उद्दिष्ट्य निश्चित करण्यात येते.

हेही वाचा – मुंबई : पूर्व उपनगरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद; चेंबूर, गोवंडी, देवनारमध्ये पाणी नाही

मागील पाच महिन्यातील रुग्णांची संख्या

जानेवारी ते मे या पाच महिन्यांमध्ये हिवतापाचे एक हजार ६१२ रुग्ण सापडले. तर डेंग्यूचे ३३८, चिकुनगुनियाचे २१, गॅस्ट्रोचे ३४७८, हेपटायटिसचे २४८ रुग्ण सापडले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी रुग्ण सापडले आहेत.