मुंबई : नंदुरबारच्या ग्रामीण रुग्णालयात बाळंतपणासाठी आलेल्या आवडाबाईला प्रसुतीदरम्यान वैद्यकीय गुंतागुंत निर्माण झाली होती. तेथील डॉक्टरांनी टेलिमेडिसीनच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधल्यानंतर नेमक्या उपचाराची दिशा स्पष्ट झाली आणि बाळाचा सुखरूप जन्म झाला तसेच आईचेही प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. दुर्गम भागात अशा गुंतागुतींच्या अनेक शस्त्रक्रियामध्ये आरोग्य विभागाची टेलिमेडिसीन योजना रुग्णांसाठी कमालीची महत्त्वपूर्ण ठरताना दिसत आहे.
राज्यातील दुर्गम व आदिवासी भागांसाठी सुरु करण्यात आलेली टेलीमेडिसिन प्रकल्प सेवा रुग्णांसाठी संजीवनी ठरतेय. या योजनेच्या माध्यमातून दुर्गम भागातील आजारी रुग्णांचे निदान करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळत असून, २०१९ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत एकूण १,१३,५६७ रुग्णांवर टेलिमेडिसिनच्या मदतीने उपचार करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना आरोग्य सेवा देणे म्हणजे टेलिमेडिसिन.यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रुग्णाशी संवाद साधला जातो तसेच रुग्णांचे आरोग्य अहवाल तसेच स्थानिक डॉक्टरांशी संवाद साधत तज्ञ डॉक्टर उपचारासाठी नेमके मार्गदशन करतात. त्याचप्रमाणे विशेष तंत्रज्ञानामुळे ई-स्टेथोस्कोपद्वारे रुग्णाच्या हृदयाचे ठोके आणि फुफ्फुसाचे कार्य ऐकण्याची सोय आहे. रुग्णाचे एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, एमआरआय विशिष्ट सॉफ्टवेअरने पाठवताही येतात. याशिवाय रुग्णाचे ईसीजी, ईको, अँजिओग्राफी थेट पाहण्याची सोय उपलब्ध आहे. यामुळे दुर्गम आणि आदिवासी भागातील रुग्णांवर परिणामकारक उपचार करता येत असून अनेक प्रकरणात गंभीर रुग्णांना वाचविण्यात यश आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. करोनाकाळ वगळतील दोन वर्षात प्रामुख्याने करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्यामुळे अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता अन्य शस्त्रक्रिया अपवादाने होत होत्या. त्यामुळे करोनाच्या दोन वर्षात टेलिमेडिसीन सेवचा रुग्णांसाठी कमी प्रमाणात वापर झाल्याचे दिसून येते. २०१९-२० मध्ये ३१,२८६ रुग्णांसाठी टेलिमेडिसीन सेवेचा वापर झाला तर २०२०-२१ मध्ये १२,७८६ आणि २०२१-२२ मध्ये १५,६६५ एवढ्या रुग्णांसाठी या सेवेचा वापर झाला. त्यानंतर २०२२-२३ मध्ये २५,८०५ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला तर २०२३-२४ मध्ये तब्बल २७,४०० रुग्णांसाठी टेलिमेडिसीन सेवेचा वापर करण्यात आला. २०२४-२५ (सप्टेंबरपर्यंत २०२४) मध्ये १३,६१२ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला असून २०१९ पासून आतापर्यंत १,१३,५६७ रुग्णांनी टेलिमेडिसीन सेवेचा लाभ घेतला.
हेही वाचा…एसटीच्या चालक, वाहकाने मद्यपान केल्याचे आढळल्यास कारवाई, विशेष तपासणी मोहीम सुरू
राज्यात सप्टेंबर २००६ साली इस्त्रोच्या मदतीने आरोग्य विभागाने टेलिमेडिसीन सेवा सुरु केली होती. हा पथदर्शक प्रकल्प मुंबईच्या के.ई.एम. हॉस्पिटलमधील विशेषज्ञांच्या मदतीने राज्यातील लातूर, बीड, नंदूरबार, सिंधुदूर्ग, सातारा या जिल्हा रुग्णालयात तर उपजिल्हा रुग्णालय कराड येथे टेलीमेडिसिन सुविधा सुरु करण्यात आली. त्यानंतर २००७-०८ मध्ये टेलीमेडिसिन सुविधेचा विस्तार २० जिल्हा रुग्णालये, दोन उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आला. फेब्रवारी २०११ मध्ये टेलीमेडिसिन नेटवर्क इस्त्रो बँडविडथ वरुन बीएसएनएल/एमटीएनएल ब्रॉडबॅड सुविधेद्वारे ३० उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांना जोडण्यात आले आहे. २०२०-२१ मध्ये टेलिमेडिसीन सेवेचा विस्तार आदिवासी व दुर्गम भागातील आरोग्य विभागाच्या रुग्णालयात करण्यात आला असून ही सेवा अधिक परिणामकारक कशी करता येईल यादृष्टीने आमचे प्रयत्न असतील असे आरोग्यसंचालक डॉ नितीन अंबाडेकर यांनी सांगितले.