शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती चिंताजनक बनल्याचे वृत्त बुधवारी रात्री पसरताच कलानगरात सुरू झालेली रीघ गुरुवारी दिवस चढत गेला तसतशी वाढत चालली. सामान्य शिवसैनिकापासून उद्योग, क्रीडा, कला व राजकीय क्षेत्रांतील असंख्य नामवंतांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. रात्री अकराच्या सुमारास उद्धव ठाकरे आदित्य व रश्मी ठाकरे यांच्यासह गंभीर चेहऱ्याने मातोश्रीबाहेर आले. तेव्हा वातावरणातील तणाव शिगेला पोचला. शिवसेनाप्रमुखांची प्रकृती स्थिर असून शिवसैनिकांनी शांतता व संयम बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतरही वातावरणातील गांभीर्य कायम होते.
भाऊबीजेच्या निमित्ताने मुंबईतील रस्ते गर्दीने फुललेले असतात. उपनगरी रेल्वेगाडय़ांनाही अलोट गर्दी असते. दर वर्षी दिसणारे हे दृश्य आज मात्र जाणवतदेखील नव्हते. सुनेसुने रस्ते, रिकाम्या रेल्वेगाडय़ा आणि बाळासाहेबांच्या प्रकृतीची चिंता यांमुळे अवघी मुंबई गुरुवारी दिवसभर उदासवाणी दिसत होती. बाळासाहेब उपचारांना अपेक्षित प्रतिसाद देतील आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने शिवसैनिकांसमोर येतील, अशी अपेक्षा बुधवारी मध्यरात्रीनंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर जमलेल्या चाहत्यांशी बोलताना व्यक्त केली, तेव्हा ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जोरदार गजर झाला आणि सकाळपासून ठिकठिकाणी बाळासाहेबांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना, यज्ञयागही सुरू झाले. बाळासाहेबांची प्रकृती सुधारत आहे, या भावनेने सुखावलेली गर्दी संध्याकाळनंतर हळूहळू पांगली आणि मुंबईवर दिवसभर दाटून राहिलेले चिंतेचे सावट पुसट झाले.. संध्याकाळनंतर पुन्हा दिवाळीचे वातावरण आकार घेऊ लागले, पण त्यात फारसा उत्साह दिसत नव्हता. बुधवारी संध्याकाळपासून कलानगरला शिवसैनिकांचा वेढा पडला होता. बाळासाहेबांच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्याची कमालीची उत्सुकता प्रत्येक शिवसैनिकाच्या चेहऱ्यावर दाटली होती.
गर्दी वाढत चालल्याचे लक्षात येताच परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. मातोश्रीबाहेरचा परिसर प्रवेशासाठी बंद करण्यात आला. राज्य राखीव पोलीस दलाचे सशस्त्र जवानही बंदोबस्तासाठी दाखल झाले आणि कलानगरला जणू पोलिसी छावणीचे रूप प्राप्त झाले. चित्रवाणी वाहिन्यांवरून क्षणाक्षणाच्या घडामोडींच्या बातम्या राज्यभर पोहोचल्या आणि गावोगावी बाळासाहेबांच्या चाहत्यांनी प्रार्थना सुरू केल्या. पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्रात शिवसैनिकांनी पांडुरंगाला साकडे घातले, तर मुंबईत अनेक ठिकाणी यज्ञयाग सुरू झाले. मालाडमध्ये शिवसेनाप्रमुखांच्या स्वास्थ्यासाठी महाआरतीचे आयोजन करण्यात आले.
सकाळी साडेआठच्या सुमारास भाजप नेते गोपीनाथ मुंडे औरंगाबादहून येऊन थेट मातोश्रीवर दाखल झाले आणि तेथून निघताना बाळासाहेबांची प्रकृती स्थिर आहे, असा निर्वाळा त्यांनी दिला. मात्र दुसरीकडे सर्वत्र बंदोबस्तात वाढ केली जात होती. काही ठिकाणी अतिदक्षतेच्या सूचना दिल्या गेल्या होत्या, पोलिसांच्या सुट्टय़ा आणि रजा रद्द करून कामावर हजर होण्याचे आदेशही जारी करण्यात आले होते.
वांद्रे परिसरातील आकाशकंदील, दिव्यांच्या माळा उतरविल्या गेल्या होत्या आणि दुकानेही उघडलीच नव्हती. यामुळे सर्वत्र संभ्रमाचे आणि काळजीचे वातावरण होते. मातोश्रीच्या प्रवेशद्वारावरील आकाशकंदीलही उतरविण्यात आला आणि काळजीचा सूर आणखीनच गहिरा झाला. शिवाजी पार्कच्या मैदानावर साफसफाई, फिरती शौचालये आदींची तयारी सुरू झाल्याने चिंताग्रस्त कार्यकर्त्यांमध्ये मानसिक तणावही दाटू लागला. तोवर दुपारचा सूर्य तळपू लागला होता आणि बाळासाहेबांच्या भेटीसाठी नेते, अभिनेते, उद्योगपतींची रीघ सुरू झाली होती.
दुपारी शिवसेनेच्या सर्व शाखाप्रमुखांची बैठक बोलावली गेली. या सर्व घडामोडींमुळे चिंता वाढत असताना, अधिकृतपणे कुणीच काहीही बोलत नव्हते. गर्दी हळूहळू ओसरली, मात्र नंतरही बाळासाहेबांच्या प्रकृतीच्या काळजीने अवघी मुंबई अस्वस्थच होती.
‘मातोश्री’वर रीघ..
व्हिडीओकॉनचे वेणुगोपाळ धूत, बजाज समूहाचे राहुल बजाज, भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी, अभिनेता सलमान खान, नाना पाटेकर, भाजपचे विनोद तावडे, रिपाइंचे रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यपाल के. शंकरनारायण, तसेच रणधीर कपूर, राजीव कपूर, ऋषी कपूर आदींनी बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ‘मातोश्री’वर धाव घेतली.