गेली दोन वर्षे करोनाच्या संकटामुळे मंदीने घेरलेला बांधकाम व्यवसाय सावरू लागला असून चालू वर्षातील पहिल्या सहा महिन्यांमध्ये देशातील सात महत्त्वाच्या शहरांमधील प्रत्येकी दीड कोटी रुपयांचे किंमतीच्या सुमारे २५ हजार ६८० घरांची विक्री झाली. चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एकूण घर विक्रीच्या तुलनेत १४ टक्के आलिशान घरे विकली गेली. २०१९ मध्ये सुमारे ७ टक्के आलिशान घरांची विक्री झाली होती. महत्त्वाची बाब म्हणेज २५ हजार ६८० घरांपैकी सर्वाधिक १३ हजार ६७० घरे ही एकट्या मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) आहेत. एकूण घर विक्रीच्या २५ टक्के अशी ही घरे आहेत. त्यामुळे एमएमआरमध्ये महागड्या घरांना अधिक पसंती मिळत आहे.
हेही वाचा – मुंबई : माझगावमधील प्रिन्स अली खान रुग्णालयाची इमारत धोकादायक ; तूर्तास रुग्ण भरती बंद
‘ॲनराॅक’ने दिल्ली, मुंबई महानगर प्रदेश, बंगळूरू, पुणे, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकत्ता या सात शहरांतील सहा महिन्यांतील घरविक्रीचा अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार सातही शहरांतील महागड्या घरांच्या विक्रीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. सहा महिन्यांत एकूण एक लाख ८४ हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली होती. यापैकी १४ टक्के म्हणजेच २५ हजार ६८० घरे विकली गेली. २०१९ मध्ये एकूण घर विक्रीच्या ७ टक्के म्हणजेच १७ हजार ७४० घरे विकली गेली होती. सात शहरांपैकी एमएमआरमध्ये दीड कोटीपर्यंतच्या घरांना अधिक मागणी आहे. एमएमआरमध्ये ४४ हजार ७१० महागडी घरे विक्रीसाठी उपलब्ध होती. यापैकी १३,६७० घरे विकली गेली. त्याचवेळी एमएमआरनंतर दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील सर्वाधिक चार हजार १६० घरे विकली गेली. येथील १९ हजार ४७० महागडी घरे विक्रीसाठी उपलब्ध होती.
हेही वाचा – राणा दाम्पत्यास न्यायालयाचा दिलासा; जामीन रद्द करण्याची पोलिसांची मागणी फेटाळली
हैदराबादमध्ये ११ हजार ७३० महागडी घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली होती. यातील दोन हजार ४२० घरांची विक्री झाली. बंगळूरूमध्ये नऊ हजार ८६० पैकी दोन हजार ४३० महागड्या घरांची विक्री झाली. पुण्यात पाच हजार ८६० घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली होती. यापैकी एक हजार ४६० घरांची विक्री झाली आहे. चेन्नईमध्ये चार हजार ०२० घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली असून यातील ९२० घरे विकली गेली. कोलकत्तामध्ये १,४९० महागडी घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली होती, यातील ६३० घरे विकली गेली. करोनाकाळात मोठ्या घरांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे सध्या ग्राहक मोठ्या आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या सुविधा असलेल्या घरांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे महागड्या घरांची मागणी वाढल्याचे दिसत आहे, असे ‘ॲनराॅक’चे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले.