मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत सिकलसेल अनिमिया या अनुवांशिक आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. केंद्र शासनाने मागील वर्षीपासून देशभरात सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन मोहिमेला सुरुवात केली असून या अंतर्गत आतापर्यंत सुमारे दीड कोटी लोकांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रात ज्या गतीने याबाबत आरोग्य तपासणी होणे अपेक्षित आहे तेवढी होत नसल्याचे एकीकडे दिसून येते. तर दुसरीकडे रुग्णांच्या संख्येत लक्षणीय लाढ झाली आहे. सिकलसेल ॲनिमियाच्या रुग्णांची स्थिती ही ‘ना जगू देतो ना मरू देतो’ अशी आहे.
आई-वडिलांकडून म्हणजेच अनुवांशिक संक्रमित होणारा हा आजार आहे. केंद्र शासनाने २०२३ च्या अर्थसंकल्पात सिकलसेल निर्मूलनाचे धोरण जाहीर केले असून २०४७ पर्यंत देशातून या आजाराचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षात या आजाराचे रुग्ण व वाहाकांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले असून त्या तुलनेत चाचण्याची संख्या वेगाने होणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाच्याच डॉक्टरांचे म्हणणे आहे. आरोग्य विभागाने राज्यात २०२०-२१ मध्ये सात लाख ६५ हजार १४१ सोल्युबिलिटी चाचण्या केल्या होत्या यात ३४४ रुग्ण आढळून आले तर ६,१०५ वाहक निदर्शनाला आले. २०२१-२२ मध्ये नऊ लाख ५३ हजार ९९० सोल्युबिलीटी चाचण्या करण्यात आल्या असून यात ९३३ रुग्ण आढळले तर १०,२३७ वाहक असल्याचे आढळून आले. २०२२-२३ मध्ये आठ लाख ८२ हजार ८७३ चाचण्या करण्यात येऊन त्यात १८३८ रुग्ण व १५,७२० वाहक आढळून आले.
हेही वाचा : आरोग्य विभाग खरेदी करणार सर्व तालुक्यांसाठी ३५२ शववाहिका!
सिकलसेल ॲनिमियाचे २०४७ पर्यंत उच्चाटन करण्यासाठी आगामी काळात तीन वर्षांमध्ये ४० वर्षं वयापर्यंतच्या जवळपास सात कोटी आदिवासींची रक्त तपासणी करण्यात येणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्रितपणे सिकलसेल निर्मूलनाचा कार्यक्रम आखल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी जाहीर केले होते. प्रामुख्याने हा आजार आदिवासी भागातच आढळतो. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात सहा कोटी ७८ लाख आदिवासी आहेत. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या मते प्रत्येक ८६ व्या आदिवासी व्यक्तीमागे सिकलसेल आजाराचा एक रुग्ण सापडतो. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, ओडिसा, तामिळनाडू, कर्नाटक, आसाम, उत्तर प्रदेश, बिहार, केरळ आणि उत्तराखंड आदी राज्यात मोठ्या प्रमाणावर सिकलसेलचे रुग्ण आहेत. देशातील २७८ जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करून या आजाराचे उच्चाटन करण्यावर भर देण्यात आला आहे. यात मोठ्या प्रमाणात सिकलसेल आजाराची तपासणी तसेच विवाहपूर्व आणि गर्भधारणेच्या काळात समुपदेशन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाच्या विविध केंद्रांच्या ठिकाणी यावर उपचार केले जाणार आहेत.
हेही वाचा : मुंबई : रेल्वे स्थानकांवर विद्युत रोषणाई
सिकलसेल आजारात रक्तपेशी आपला गोल आकार बदलून कोयत्याच्या आकाराच्या होतात. साधारणपणे रक्तपेशी या गोल आकाराच्या असतात आणि त्या रक्तवाहिन्यांमधून शरीराच्या सर्व भागापर्यंत ऑक्सिजन सहज वाहून नेतात. सिकलसेल असलेल्या रक्तपेशीमधून ऑक्सिजन सहज वाहून नेता येत नाही. त्या घट्ट व चिकट असल्यामुळे रक्तपुरवठ्यामध्ये अडथळे निर्माण होतात तसेच यात रुग्णाला तीव्र वेदना होतात. लाल रक्तपेशींच्या नष्ट होण्यामुळे ॲनिमिया व कावीळ होते असे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी सांगितले. यासाठी महाराष्ट्रात आरोग्य विभागाने ठोस कार्यक्रम हाती घेतला असला तरी पुरेशा डॉक्टर व कर्मचाऱ्यांअभावी याला म्हणावी तशी गती नसल्याचे आरोग्य विभागाच्याच डॉक्टरांचे म्हणणे आहे. मागील आठ वर्षांत राज्यात सुमारे ७० लाख चाचण्या करण्यात आल्या असून यात ७,७५० रुग्ण आढळून आले तर ७६,८६८ वाहक दिसून आले. राज्यात प्रामुख्याने पालघर, नंदूरबार, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, धुळे आदी ठिकाणी सिकलसेलचे रुग्ण व वाहक जास्त प्रमाणात आढळून येत असून आगामी काळात केंद्राच्या धोरणानुसार रुग्णतपासणीचा वेग वाढविण्यात येईल असे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी सांगितले.
हेही वाचा : अटल सेतूवरील पहिला अपघात कॅमेऱ्यात कैद; ताबा सुटल्याने थेट दुभाजकाला दिली धडक, पाहा Video
“केंद्र शासनाच्या धोरणानुसार सिकलसेल निर्मूलन मोहिमेला वेग देण्यात येणार आहे. यासाठी ज्या जिल्ह्यांमध्ये सिकलसेलचे रुग्ण जास्त आढळतात तेथे व्यापक तपासणी करण्यात येईल. तसेच मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी ठोस कार्यक्रम राबविण्यात येणार असून जिल्हा रुग्णालयांपासून ते थेट प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत याची व्यापकता नेण्यात येईल”, असे सार्वजनिक आरोग्य आयुक्त धीरजकुमार यांनी म्हटले आहे.