मुंबई: महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) गणेशोत्सवादरम्यान नागरिकांच्या सेवेसाठी ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर ते गुंदवली मेट्रो ७’ मर्गिकांवरील फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. या दोन्ही मार्गिकांवर २० फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. तर सेवेच्या कालावधीत ३० मिनिटांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार रात्री ११ वाजता बंद होणारी मेट्रो सेवा ११ ते १७ सप्टेंबरदरम्यान रात्री ११.३० वाजता बंद होणार आहे.

सणासुदीच्या काळात नागरिकांना रात्री उशिरापर्यंत प्रवास करता यावा यासाठी एमएमएमओसीएलने मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याबरोबरच मेट्रो सेवांचा कालावधी अर्ध्या तासाने वाढविला आहे. त्यानुसार रात्री ११ वाजता बंद होणारी मेट्रो सेवा ११ ते १७ सप्टेंबरदरम्यान ११.३० वाजता बंद होणार आहे. या अर्ध्या तासांच्या कालावधीत एकूण २० फेऱ्यांची वाढ होणार असल्याची माहिती एमएमओसीएलने दिली आहे. अतिरिक्त २० फेऱ्यांपैकी चार फेऱ्या गुंदवली – अंधेरी पश्चिम मार्गिकेवरील असणार आहेत. रात्री १०.२०, १०.३९, १०.५० आणि ११.०० वाजता या चार फेऱ्या होणार आहेत. अंधेरी पश्चिम – गुंदवलीदरम्यान चार अतिरिक्त फेऱ्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. रात्री १०.२०, १०.४०, १०.५० आणि ११.०० यादरम्यान या अतिरिक्त फेऱ्या चालविल्या जाणार आहेत.

हेही वाचा – मुंबई : पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लाॅक

हेही वाचा – अंधेरीतील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा; परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी पालिकेची कार्यवाही

गोंदवली – दहिसर पूर्व दरम्यान दोन अतिरिक्त फेऱ्या चालविल्या जाणार आहेत. रात्री ११.२५ आणि ११.३० या वेळेत अतिरिक्त मेट्रो गाड्या धावणार आहेत. अंधेरी पश्चिम – दहिसर पूर्व दरम्यान दोन अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. रात्री ११.१५ आणि ११.३० या वेळेत अतिरिक्त फेऱ्या चालविल्या जाणार आहेत. दहिसर पूर्व – अंधेरी पश्चिम अशा चार अतिरिक्त फेऱ्या होणार आहेत. रात्री १०.५३, ११.१२, ११.२२ आणि ११.३३ या वेळेत या फेऱ्या होणार आहेत. तर दहिसर (पूर्व) – गुंदवली दरम्यान चार अतिरिक्त फेऱ्या चालविल्या जाणार आहेत. रात्री १०.५७, ११.१७, ११.२७ आणि ११.३६ दरम्यान या फेऱ्या होणार आहेत.