मुंबई : मुंबईतील लोकप्रिय हिंदी व्यावसायिक चित्रपटांच्या पलिकडे जाऊन लघुपट, माहितीपटांच्या माध्यमातून वेगवेगळे विषय हाताळणाऱ्या चित्रपटकर्मींसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (मिफ) शनिवार, १५ जूनपासून सुरुवात होत आहे. २१ जूनपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात ५९ देशांतील ६१ विविध भाषांमधील ३१४ लघुपट पाहण्याची पर्वणी सिनेरसिकांना मिळणार आहे. दोन वर्षांतून एकदाच होणारा हा महोत्सव यंदा मुंबईपुरता मर्यादित न ठेवता पुणे, कोलकत्ता, चेन्नई आणि दिल्ली येथेही लघुपट दाखवण्यात येणार आहेत.
नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (एनएफडीसी) वतीने यंदाच्या ‘मिफ’चे आयोजन करण्यात आले असून त्याची घोषणा शुक्रवारी मुंबईतील ट्रायडंट हॉटेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रिथुल कुमार यांनी पत्रकार परिषदेत महोत्सवाची सविस्तर माहिती दिली. लघुपट आणि माहितीपटांची वैश्विक आर्थिक उलाढाल १६०० कोटी डॉलर्सच्या आसपास आहे, याकडे लक्ष वेधत प्रबोधन आणि रंजन करण्यात अग्रेसर असलेल्या या चित्रपट प्रकारांची ताकद यातून दिसून येते, असे प्रतिपादन संजय जाजू यांनी केले. याशिवाय, ॲनिमेशन आणि व्हीएफएक्स उद्योगाचा विस्तारही मोठ्या प्रमाणावर झाला असून ‘छोटा भीम’, ‘चाचा चौधरी’सारख्या भारतीय ॲनिमेटेड व्यक्तिरेखा जगभरात लोकप्रिय झाल्या आहेत. या उद्योगातून आर्थिक सक्षमता आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची ताकद आपल्या चित्रपटकर्मींमध्ये असल्याचे सांगत ॲनिमेशनपट विभागाचाही यंदाच्या ‘मिफ’मध्ये समावेश करण्यात आला असल्याची माहिती जाजू यांनी दिली.
हेही वाचा >>>सागरी किनारा मार्गाची एक वाहिन जुलैअखेर सुरू करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश
५९ देशांमधून हजारहून अधिक प्रवेशिकांचा विक्रम
यंदाच्या ‘मिफ’साठी ५९ देशांमधून ६१ विविध भाषांमधील हजारहून अधिक लघुपट आणि माहितीपटांच्या विक्रमी प्रवेशिका प्राप्त झाल्याची माहिती प्रिथुल कुमार यांनी दिली. यापैकी ३१४ निवडक लघुपट – माहितीपट आणि ॲनिमेशनपट मुख्य स्पर्धा विभागाबरोबरच विविध विभागात दाखवण्यात येणार आहेत. महोत्सवाची सुरुवात ‘बिली ॲण्ड मॉली, ॲन ऑटर लव्ह स्टोरी’ या लघुपटाने करण्यात येणार आहे. तसेच, कान महोत्सवातील एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचा पुरस्कार विजेता लघुपट ‘सनफ्लॉवर्स वर द फर्स्ट टु नो’ हाही ‘मिफ’च्या शुभारंभाच्या सोहळ्यात दाखवण्यात येणार आहे. ‘मिफ’मधील सगळे चित्रपट पेडर रोडवरील फिल्म डिव्हिजन आणि एनएफडीसीच्या आवारात पाहता येणार आहेत. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नसून महोत्सवातील चित्रपटांच्या वेळा आणि इतर माहिती ‘मिफ’च्या संकेतस्थळाबरोबरच खास ॲपवरही उपलब्ध करण्यात आली आहे.
‘मिफ’मध्येही पहिल्यांदाच भरणार डॉक फिल्म बाजार
लघुपट – माहितीपटांना देशोदेशीची बाजारपेठ, वितरक, निर्माते उपलब्ध करून देण्याबरोबरच नवोदित चित्रपटकर्मींना प्रशिक्षण आणि आर्थिक मदत मिळवून देण्याच्या उद्देशाने पहिल्यांदाच ‘मिफ’मध्येही डॉक फिल्म बाजार भरवण्यात येणार आहे.
दिव्यांगांसाठी खास सोय
दिव्यांगांना ‘मिफ’मध्ये येणे-जाणे सुलभ व्हावे यासाठी ‘स्वयम’ या सामाजिक संस्थेच्या मदतीने सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिवाय, महोत्सवातील काही चित्रपट दिव्यांगांसाठी भारतीय सांकेतिक भाषेत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.