मुंबई : शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात श्वसनाचा तीव्र त्रास होत असलेल्या क्षयरोग रुग्णांसाठी १० खाटांचा आयआरसीयू विभाग सुरू करण्यात येणार आहे. त्या विभागासाठी दोन वैद्यकीय अतिदक्षता तज्ज्ञ आणि चार वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सहा डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच हा विभाग सर्व सोयीसुविधांनी अद्ययावत असल्याने श्वसनाचा तीव्र त्रास होत असलेल्या रुग्णांना यापुढे अन्य रुग्णालयांमध्ये जावे लागणार नाही. त्यामुळे शिवडी क्षयरोग रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
क्षयरोग रुग्णांना न्यूमोनिया किंवा तीव्र श्वसन विकार (एआरडीएस) झाल्यास त्यांना आयआरसीयूची आवश्यकता भासते. हे एक प्रकारचे जीवघेणे लक्षण आहे. क्षयरोग रुग्णांपैकी तीन टक्के क्षयरोग रुग्णांना त्याची गरज भासते. क्षयरोग रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना आयआयसीयू जागा मिळविण्यासाठी मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये संघर्ष करावा लागतो. सरकारी रुग्णालयांतील आयआयसीयूमध्ये जागा मिळावी यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा भर असतो. मुंबईत बहु-औषध प्रतिरोधक क्षयरोग रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र शिवडी क्षयरोग रुग्णालयात आयआरसीयूच्या अवघ्या दोनच खाटा उपलब्ध आहेत. त्यामुळे दोनपेक्षा अधिक रुग्ण आल्यास त्या रुग्णांना अन्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवावे लागते. परिणामी रुग्णांची ओढाताण होते. रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन शिवडी क्षयरोग रुग्णालय प्रशासनाने आयआरसीयूच्या खाटांची संख्या वाढविण्याबरोबरच रुग्णालयात स्वतंत्र आयआरसीयू विभाग सुरू केला आहे. या विभागात श्वसनाचा तीव्र त्रास होत असलेल्या क्षयरोग रुग्णांसाठी १० खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या विभागासाठी दोन वैद्यकीय अतिदक्षता तज्ज्ञ आणि चार वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सहा डॉक्टरांची नियुक्ती शिवडी क्षयरोग रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तसेच हा विभाग सोयीसुविधांनी अद्ययावत असल्याने श्वसनाचा त्रास होत असलेल्या रुग्णांना यापुढे अन्य रुग्णालयांमध्ये जावे लागणार नाही. नव्याने स्वतंत्रपणे सुरू करण्यात आलेला आयआरसीयू विभाग लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवडी क्षयरोग रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा – ठाणे-बोरीवली बोगद्यास अखेर महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्पाचा दर्जा
हेही वाचा – मुंबई : राष्ट्रीय उद्यानातील पात्र झोपडीधारकांचे मरोळ-मरोशीतील पुनर्वसनासही विरोध
क्षयरोग रुग्णांच्या मृत्यूमध्ये घट
शिवडी क्षयरोग रुग्णालयात उपचारासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रुग्णांवर तातडीने उपचार होत असल्याने क्षयरोग रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत घट होत आहे. क्षयरोगामुळे २०२१ मध्ये ९७४ रुग्णांचा मृत्यू झाला. तर २०२२ मध्ये ९५९ रुग्णांचा मृत्यू झाला. २०२३ मध्ये क्षयरोगाने मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या ८५५ पर्यंत खाली आली, तर मे २०२४ पर्यंत ही संख्या ३९७ पर्यंत कमी झाली.