Marwadi vs Marathi Conflict in Mumbai : “आपुल्या घरात हाल सोसते मराठी” सुरेश भटांची ही कविता सातत्याने आठवावी, असे अनेक प्रसंग वारंवार मुंबईत घडत आहेत. मराठी माणसाला घर नाकारण्यापासून नोकरी नाकारण्यापर्यंतच्या अनेक घटना मुंबईने अनुभवल्या आहेत. आता त्याही पलिकडे जाऊन मुंबईत भाजपाची सत्ता आल्याने यापुढे मारवाडीतच बोलायचं अशी दमदाटी एका दुकानदाराने महिलेला केली. धक्कादायक म्हणजे दक्षिण मुंबईतील गिरगावातील खेतवाडी येथे हा प्रकार घडला आहे. एबीपी माझाने याविषयीचा सविस्तर अहवाल व्हिडिओरुपात प्रसिद्ध केला आहे.
गिरगावातील स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी या विषयाला तोंड फोडलं. पदाधिकारी म्हणाले, “गिरगावातील खेतवाडी येथे काही महिला तक्रारी घेऊन आल्या होत्या. खेतवाडी येथील एका मारवाडी व्यापाराने मराठी महिलांना मराठीत का बोलल्या म्हणून जाब विचारला. तसंच महाराष्ट्रात भाजपाचं सरकार आहे त्यामुळे मुंबईत मारवाडीतच बोलायचं, मराठी चालणार नाही, अशी धमकी दिली होती.”
हेही वाचा >> Sanjay Raut : “अजित पवार भावी किंवा माजी नाही, ते सदैव…”, उपमुख्यमंत्री पदावरून संजय राऊतांचा टोला!
“मुंबई भाजपाचं, मुंबई मारवाडींचं…”
या घटनेतील विमल या महिलेने सविस्तर माहिती दिली. त्या म्हणाल्या, मी मारवाडी व्यापाऱ्याच्या दुकानात गेले. त्याने मला मारवाडीतच बोलायला सांगितलं. मी याबाबत कारण विचारलं. तीनवेळा मी कारण विचारलं. त्यावर तो म्हणाला भाजपा सरकार आलं आहे. मारवाडीत बोलायचं. मराठीत बोलायचं नाही. ‘मुंबई भाजपाचं, मुंबई मारवाडींचं…’ यावर आता तोडगा काय?” असा प्रश्न या महिलेने विचारला.
मंगलप्रभात लोढांनी सहकार्य केलं नाही
“मी ही तक्रार घेऊन आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे गेले होते. तर त्यांनी उत्तर दिलं की आमच्यात वाद लावले जात आहेत. मी यांना उत्तर काय द्यायचं. मी लोढांना आतापर्यंत सहकार्य केलं. आम्ही त्यांना निवडून दिलं आणि ते आता म्हणतात की ते आम्हाला ओळखत नाहीत. तुम्हाला ओळखच पाहिजे का? तुम्ही मलबार हिलचे आमदार आहात तर तुम्हाला ओळखच पाहिजे का? या मलबार हिलमधील प्रत्येक नागरिक तुमचाच ना? मग ओळखच पाहिजे का?”, असा सवालही या महिलेने विचारला.
दरम्यान, मनसेकडे हे प्रकरण गेल्यानंतर मनसैनिकांनी या दुकानदाराला चोप दिला. तसंच, त्याने माफीही मागितली. मात्र, असे प्रकार वारंवार मुंबईत घडताना दिसत असल्याने पुन्हा एकदा राज्यात भाषिक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.