मुंबईत दहा टक्के पाणी कपात लागू करण्यावरुन आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मुंबईत पाणी कपातीची गरज नाही. पाणी माफियांवर वचक निर्माण केल्यास आणि पाणी गळतीचे प्रमाण कमी केले तर मुंबईत पाणी कपात करावी लागणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, सध्या मुंबई राम भरोसे असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

सरत्या पावसाने दगा दिल्याने धरणे तुडूंब भरूनही गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाणीसाठा उपलब्ध असल्याने गुरूवारपासून मुंबईत दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवरुन मुंबई महापालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेवर टीका केली आहे. मुंबईत पाणी कपातीची गरज आहे का ? माझ्यामते मुंबईतील पाणी गळतीचे प्रमाण कमी केले आणि टँकर माफियांवर वचक निर्माण केला तर मुंबईला मुबलक पाणी पुरवठा शक्य आहे. पाणी कपातीचा निर्णय हे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे अपयश असून मुंबई ‘राम भरोसे’ असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, १ नोव्हेंबर २०१८ ते ३१ जुलै २०१९ पर्यंत एकूण २९३ दिवस असून वैतरणा तलाव क्षेत्रात २४२ दिवस तर भातसा तलाव क्षेत्रात २०९ दिवस पुरेल एवढे पाणी साठा आहे. उर्वरित दिवसांसाठी राखीव साठय़ातून पाणी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे राखीव पाणी साठय़ाच्या कमीत कमी वापर व्हावा यासाठी सरसकट १० टक्के पाणी कपात सुचवण्यात येत असल्याचे प्रशासनाने म्हटले होते.