मुंबई : निवासी डॉक्टरांना नियमित विद्यावेतन देण्याच्या सूचना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये दिल्या होत्या. मात्र त्यानंतर अवघ्या दोन महिन्यानी म्हणजे ऑक्टोबरपासून आतापर्यंत जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना विद्यावेतन मिळालेले नाही. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला केराची टोपली दाखविल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने विविध मागण्यांसाठी ऑगस्टमध्ये राज्यभर आंदोलन केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनाचा प्रश्न मार्गी लावताना नियमित विद्यावेतन देण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण विभागाला दिल्या होत्या. मात्र त्यानंतर अवघ्या दोन महिन्यानंतर म्हणजे ऑक्टोबरपासून आतापर्यंत जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना विद्यावेतन मिळालेच नाही. तसेच त्यापूर्वीही निवासी डॉक्टरांना एक महिना विलंबाने विद्यावेतन मिळत होते. मात्र ऑक्टोबरपासून त्यांना विद्यावेतन देण्यात आलेले नाही. ऑक्टोबर ते डिसेंबर असे तीन महिन्यांचे विद्यावेतन न मिळाल्याने डॉक्टरांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यांना दैनदिन खर्च भागविण्याबरोबरच रोजच्या जेवणाची सोय करणे अवघड झाले आहे. अनेक निवासी डॉक्टरांची घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना मूलभूत खर्च भागविणे अवघड झाले आहे.
हेही वाचा : मुंबई : उकाड्यात वाढ
विद्यावेतन नियमितपणे मिळावे यासाठी निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला. विद्यावेतन न मिळाल्याने निवासी डॉक्टर प्रचंड तणावाखाली वावरत असून, त्यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या समस्येकडे लक्ष देऊन निवासी डॉक्टरांना तातडीने विद्यावेतन द्यावे, अशी मागणी ‘मार्ड’ने सरकारकडे केली आहे.
रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या डॉक्टरांना त्यांच्या हक्काच्या मागणीसाठी वारंवार संपावर जावे लागत आहे, हे निराशाजनक आहे. आरोग्य सेवेमध्ये अत्यावश्यक भूमिका बजावणाऱ्या निवासी डॉक्टरांनी मानसिक तणावाखाली येऊन आत्महत्या केल्यास याला जबाबदार कोण ? – डॉ. संपत सूर्यवंशी, राज्य समन्वयक, मार्ड
हेही वाचा : वीजदरवाढ तूर्तास टळली, ‘डीसल्फरायझेशन’ची सक्ती दोन वर्षे लांबणीवर गेल्याने दिलासा
विद्यावेतन देण्यासाठी प्रशासकीय कार्यालयाला १० दिवसांपूर्वी अनुदान मिळाले. त्यानंतर वित्त विभागाकडून देयके मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे निवासी डॉक्टरांच्या खात्यामध्ये सोमवारी विद्यावेतन जमा होईल. – डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय