Mumbai Last Kali Peeli To Go Off Road: अनेक दशकांपासून मुंबईच्या शहरी आयुष्याचे चित्रण करताना सर्व कलाप्रकारांमध्ये ‘प्रीमियर पद्मिनी’ टॅक्सीचं स्थान निश्चित असायचं. ‘काली-पीली’ अशा नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या प्रीमियर पद्मिनी टॅक्सी फक्त वाहतुकीचे साधन नसून मुंबईच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग ठरल्या आहेत. मात्र आता नवीन मॉडेल्स आणि अॅप-आधारित कॅब सेवांच्या वाढत्या वापरामुळे काळी- पिवळीचा मुंबईच्या रस्त्यांवरील प्रवासाचा अंत होणार आहे. सार्वजनिक वाहतुकीचे साधन असणाऱ्या बेस्टच्या ताफ्यातील शेवटची डिझेल-चालित डबल-डेकर बससेवा बंद झाल्यावर आता पाठोपाठ पद्मिनी टॅक्सी सेवा सुद्धा बंद होणार आहे.

हिंदुस्थान टाइम्सने परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीच्या हवाल्याने सांगितले की, शेवटची प्रीमियर पद्मिनी २९ ऑक्टोबर २००३ रोजी मुंबई शहराच्या अधिकारक्षेत्रात असलेल्या ताडदेव आरटीओमध्ये काळी-पिवळी टॅक्सी म्हणून नोंदणीकृत झाली होती. नोंदणीनंतर २० वर्षांपर्यंत टॅक्सीच्या वापरला परवानगी असते. आता ही वैधता संपुष्टात येत असल्याने आता सोमवारपासून मुंबईला अधिकृतपणे प्रीमियर पद्मिनी टॅक्सी पाहायला मिळणार नाही.

मुंबईत आता ४०,००० पेक्षा जास्त काळ्या-पिवळ्या कॅब आहेत. ९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, ‘निळ्या आणि चंदेरी’ रंगांच्या वातानुकूलित ‘कूल कॅब्स’ सुद्धा ही संख्या सुमारे ६३,००० इतकी आहे. काही वर्षांपूर्वी, शहरातील सर्वात मोठी टॅक्सी चालक संघटना असलेल्या मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने किमान एक काली-पिली टिकवून ठेवण्याची विनंती सरकारकडे केली होती, परंतु त्यात यश आले नाही.

मुंबईतील शेवटची प्रीमियर पद्मिनी टॅक्सी ही प्रभादेवीचे रहिवासी अब्दुल करीम कारसेकर यांच्या नावे नोंदणीकृत आहे. MH-01-JA-2556 या क्रमांकाची ही टॅक्सी मुंबईची शान व आमची जान (जीव) आहे असे कारसेकर यांनी म्हटले आहे. पुढे त्यांनी म्हटले की, आता या प्रकारच्या टॅक्सीचे सुटे भाग उपलब्ध नसल्यामुळे वाहनाची देखभाल करणे कठीण आहे, परंतु तरीही सरकारने परवानगी दिल्यास त्यांना त्यांची टॅक्सी स्वखर्चाने जतन करायची आहे.

१९८८ पासून टॅक्सी चालवणारे आणि एकेकाळी सात प्रीमियर पद्मिनी असलेले कारसेकर म्हणाले की, त्यांची कॅब जुनी असली तरी लोक अजूनही तिची प्रशंसा करतात आणि आधुनिक पर्यायांपेक्षा याच टॅक्सीला पसंत करतात.

Story img Loader