मुंबईः कांदिवली येथील रुग्णालयातील शौचालयात गेलेल्या महिला डॉक्टरचे चित्रीकरण करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला कांदिवली पोलिसांनी मंगळवारी अटक केली. महिला डॉक्टरने चित्रीकरण करीत असलेल्या आरोपीला पाहताच आरडाओरडा केला. त्यानंतर तात्काळ आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरोधात विनयभंग व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : Mumbai Crime: दादरच्या ‘सूटकेस मर्डर’ची इनसाईड स्टोरी, “आरोपी मूक बधिर, टॅक्सीने आले आणि…”
जयेश सोलंकी (३५)असे अटक करण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे. मंगळवारी सकाळी तक्रारदार डॉक्टर शौचालयात गेली असता कोणी तरी मोबाइलद्वारे चित्रीकरण करत असल्याचे तिला दिसले. त्यावेळी तिने आरडाओरडा केला. तेथे जमलेल्यांनी सोलंकीला पकडले. त्यानंतर महिला डॉक्टरने याप्रकरणी पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून याबाबतची माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर महिला डॉक्टरच्या तक्रारीवरून याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा मोबाइल जप्त करण्यात आला असून त्याद्वारे पुढील तपास सुरू आहे.