मुंबई : उन्हाळ्यात प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरून आणखी एक विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. मुंबई – करमळी विशेष रेल्वेगाडीमुळे कोकणवासियांना प्रवास करणे सोयीस्कर होईल. या रेल्वेगाडीचे आरक्षण ८ एप्रिलपासून सुरू करण्यात आले आहे.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१०५१ / ०१०५२ लोकमान्य टिळक टर्मिनस – करमाळी – लोकमान्य टिळक टर्मिनस वातानुकूलित विशेष साप्ताहिक रेल्वेगाडी चालविण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०१०५१ लोकमान्य टिळक टर्मिनस – करमळी वातानुकूलित विशेष साप्ताहिक रेल्वेगाडी ११ एप्रिल ते २३ मे दरम्यान दर शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता करमळी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०५२ करमळी – लोकमान्य टिळक टर्मिनस वातानुकूलित विशेष साप्ताहिक रेल्वेगाडी १२ एप्रिल ते २४ मेदरम्यान दर शनिवारी करमळीहून दुपारी २.३० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि या स्थानकांवर थांबा असेल.
या रेल्वेगाडीला एकूण २० एलएचबी डबे असतील. यामध्ये द्वितीय श्रेणी वातानुकूलित ८ डबे, तृतीय श्रेणी वातानुकूलित १० डबे, जनरेटर कार दोन डब्यांचा समावेश आहे. या रेल्वेगाडीचे आरक्षण ८ एप्रिल रोजीपासून प्रवासी आरक्षण यंत्रणा (पीआरएस) आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.
वास्को द गामा – मुझफ्फरपूर विशेष रेल्वेगाडी धावणार
गाडी क्रमांक ०७३११/०७३१२ वास्को द गामा – मुझफ्फरपूर – वास्को द गामा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस धावणार आहे. गाडी क्रमांक ०७३११ वास्को द गामा – मुझफ्फरपूर ७ एप्रिल ते २ जूनदरम्यान दर सोमवारी वास्को द गामा येथून साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस दुपारी ४ वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी तिसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता मुझफ्फरपूर जंक्शन येथेे पोहोचेल. गाडी क्रमांक ०७३१२ मुझफ्फरपूर जंक्शन – वास्को द गामा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १० एप्रिल ते ५ जूनदरम्यान दर गुरुवारी मुझफ्फरपूर जंक्शनहून दुपारी २.४५ वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी तिसऱ्या दिवशी दुपारी २.५५ वाजता वास्को द गामा येथे पोहोचेल.
या रेल्वेगाडी मडगाव, थिवि, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, मनमाड, भुसावळ, खांडवा जंक्शन, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर येथे थांबेल. या रेल्वेगाडीला एकूण २० एलएचबी डबे असतील. यात द्वितीय श्रेणी वातानुकूलित एक डबा, तृतीय श्रेणी वातानुकूलित पाच डबे, शयनयान १२ डबे, जनरेटर कार एक, एसएलआर एक अशी संरचना असेल, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.