मुंबई : जगभरातील सर्वाधिक गुंतागुंतीच्या वाहतुकीपैकी एक म्हणजे मुंबईतील लोकल सेवा. मुंबईतील महत्त्वाच्या गर्दीच्या स्थानकांतून काही मिनिटांतमध्ये लोकलची एक फेरी होते. त्यामुळे अतिरिक्त लोकल फेऱ्या वाढवण्यावर मर्यादा येत आहेत. सध्या लोकल मार्गिकेवरील ताण कमी करण्यासाठी दोन लोकलमधील अंतर कमी करण्यावर भर दिला जात आहे. मुंबईच्या लोकल मार्गावर अत्याधुनिक कवच ४.० प्रणाली राबविण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे दोन लोकलमधील १८० सेकंदाचे अंतर १५० सेकंदावर येणार आहे. परिणामी, येत्या काळात अतिरिक्त ३०० लोकल फेऱ्यांची भर पडेल, असा दावा रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी केला.
मुंबईमधील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरून दररोज सुमारे ३,२०० लोकल फेऱ्या चालवण्यात येतात. या लोकल फेऱ्यांमधून सुमारे ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. यापैकी मध्य रेल्वेवर लोकलच्या १,८१०, तर पश्चिम रेल्वेवर १,४०६ फेऱ्या होतात. या लोकलमधून अनुक्रमे ४० आणि ३५ लाख प्रवासी प्रवास करतात. सध्या दोन लोकल फेऱ्यांमधील अंतर ३ मिनिटे आहे. प्रवाशांना दर ३ मिनिटांनी एका लोकलच्या फेरीतून प्रवास करता येतो. त्यामुळे प्रवाशांच्या गर्दीचे विभाजन करणे कठीण होत आहे. तीन मिनिटांपेक्षा कमी वेळ करून लोकल चालवणे धोक्याचे ठरेल. त्यामुळे कवच ४.० ही यंत्रणा लोकल मार्गावर बसवण्यात येणार आहे. दोन लोकलमधील अंतर अडीच मिनिटांवर येईल. तसेच पुढील काळात दोन मिनिटांचे अंतर करणे शक्य होणार आहे. दोन लोकल फेऱ्यांमधील अंतर कमी होऊन, वेळेची बचत होईल. तर, लोकल फेऱ्याची वारंवारता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला.
लोकलमधील गर्दी वाढत असून, वाढती गर्दी विभाजित करण्यासाठी लोकल फेऱ्या वाढवणाऱ्यावर भर देण्यात येत आहे. सध्या ३,२०० लोकल फेऱ्या धावत असून, या फेऱ्यांच्या १० टक्के लोकल फेऱ्या लवकरच वाढविण्यात येतील, असे दावा वैष्णव यांनी केला.