मुंबई : तरुणाई, कल्पकता, आणि उत्साह म्हणजे ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा हे समीकरण सिद्ध करणारी महाअंतिम फेरी शनिवारी रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत रवींद्र नाटय़ मंदिरात रंगली. आपापल्या विभागांतून अव्वल ठरलेल्या एकांकिकांना टक्कर देऊन मुंबईच्या कीर्ती एम. डुंगरसी महाविद्यालयाची ‘उकळी’ ही ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ ठरली. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ठाण्याच्या सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या ‘डोक्यात गेलंय’ आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक कोल्हापूरच्या डिपार्टमेन्ट ऑफ टेक्नोलॉजी शिवाजी विद्यापीठाच्या ‘विषाद’ या लोकांकिकेने पटकावले.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत लोकसत्ता लोकांकिकेच्या यंदाच्या पर्वात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी, नागपूर आणि औरंगाबाद या केंद्रांवर प्राथमिक आणि विभागीय अंतिम फेरीचे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करून आठ एकांकिका मुंबईत पार पडलेल्या महाअंतिम फेरीत दाखल झाल्या होत्या. विद्यार्थ्यांनी मेहनतीने उभ्या केलेल्या एकांकिका पाहण्यासाठी प्रेक्षकांनी रवींद्र नाटय़ मंदिराबाहेर सकाळपासून गर्दी केली होती. भवताली दिसणारे प्रश्न, माणसाचे अंतरंग यावर, वरकरणी छोटय़ा वाटणाऱ्या पण खोलवर भिडणाऱ्या मुद्दय़ांवर विद्यार्थ्यांनी एकांकिकांच्या माध्यमातून भाष्य केले. नाटकाच्या ओढीने मुंबई गाठलेल्या या कलाकारांमध्ये कमालीची शिस्त दिसून येत होती. एक एकांकिका मंचावर सादर होत असताना पडद्यामागे दुसऱ्या संघाची तयारी सुरु होती. बक्षिसाच्या अशेपेक्षाही उत्कृष्ट सादरीकरणाची जिद्द त्यांच्यात होती. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट सादरीकरणांना भरभरुन दाद देण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी सकाळपासूनच नाटय़गृहाबाहेर गर्दी केली होती. काहीसे दडपण आणि तितक्याच उत्साहासह कलाकारांनी रंगमंचावर पाऊल ठेवताच प्रेक्षकांचीही त्यांना भरभरून दाद मिळत होती.
‘लोकसत्ता लोकांकिका २०२२’च्या महाअंतिम फेरीचे परिक्षण लेखक-दिग्दर्शक-अभिनेते विजय केंकरे, अभिनेत्री वंदना गुप्ते आणि लेखक-नेपथ्यकार प्रदीप मुळय़े यांनी केले. तर कुणाल रेगे यांनी आपल्या निवेदनातून प्रेक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. विविध विषय, बोली, सादरीकरणातील प्रयोग यांसह रंगत गेलेल्या स्पर्धेच्या निकालाचा क्षण जवळ आला आणि स्पर्धकांसह प्रेक्षकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली. एकेक पारितोषिक जाहीर होत गेले आणि विद्यार्थ्यांच्या जल्लोषाने व नाटय़गृह दणाणून गेले.
ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. पारितेषिक वितरण समारंभापूर्वी रावल यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ज्येष्ठ रंगकर्मी अजित भुरे यांनी रावल यांना बोलते केले. निर्मात्या वैजयंती आपटे, अभिनेते अतुल परचुरे, नाटककार शफाअत खान, प्रेमानंद गज्वी, कुमार सोहोनी, गिरीश पत्के, निळकंठ कदम, अनिल बांदिवडेकर, संजय क्षेमकल्याणी, शिल्पा नवलकर, प्रल्हाद कुरतडकर, प्राजक्त देशमुख, विजय निकम, प्रणव रावराणे, सुयश टिळक, राणी वर्मा, विजय कदम, ऋतुराज वानखेडे, कुमार सोहोनी, वर्षां दांदळे, संग्राम साळवी, सिद्धार्थ जाधव, जुई गडकरी यांसह अनेक मान्यवर कलाकार, दिग्दर्शक, नेपथ्यकार, निर्माते कलाकारांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते.
सॉफ्ट कॉर्नरचे दिलीप कुलकर्णी, झी युवाचे सुमुख तावडे, बी. जी. चितळे डेअरीचे प्रदीप देशपांडे, हर्षदा भेंडे, भाग्येश साळुंके तसेच आयरिस प्रॉडक्शन्सचे विद्याधर पाठारे आणि अस्तित्वचे रवी मिश्रा विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यास आवर्जून उपस्थित होते.
पेज टू स्टेज- सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे
सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम – ‘उकळी’ किर्ती महाविद्याल, मुंबई
सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय – ‘डोक्यात गेलय’ ज्ञानसाधना महाविद्यालय,ठाणे
सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय – ‘विषाद’ डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अजय पाटील (डोक्यात गेलयं)
सर्वोत्कृष्ट लेखक- चैतन्य सरदेशपांडे (उकळी)
सर्वोत्कृष्ट अभिनय- श्रेयस काटकर (उकळी)
सर्वोत्कृष्ट अभिनय- दृप्ता कुलकर्णी (विषाद)
सर्वोत्कृष्ट अभिनय- अजय पाटील (डोक्यात गेलंय)
सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार- सिद्धेश नांदलस्कर (डोक्यात गेलंय)
सर्वोत्कृष्ट संगीत- सानिका अनिल चव्हाण (विषाद)
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना- सिद्धेश नांदलस्कर (डोक्यात गेलंय)
प्रशस्तीपत्रक
प्रतिक पाटील (विषाद, डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
पायल जाधव (हार्लेक्विन, स्मिता हिरे महाविद्यालय, नाशिक)
पवन पोटे (टॉक, न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, औरंगाबाद)
रश्मी सांगळे (उकळी, किर्ती महाविद्यालय, मुंबई)
शुभम गोविलकर (कुपान, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)
प्रायोजक
‘लोकसत्ता’ आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा सहप्रायोजक ‘झी युवा’ आणि ‘टुगेदिरग’च्या सहकार्याने पार पडली. ही स्पर्धा पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘केसरी टूर्स’ आणि ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’तर्फे आहे. साहाय्य ‘अस्तित्व’चे आहे. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट, मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.