मुंबई, पुणे : कोरडय़ा हवामानामुळे मुंबई आणि कोकण विभागासह राज्यात अन्यत्र दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाली असून थंडीच्या हंगामात म्हणजे नोव्हेंबरमध्ये ऑॅक्टोबरच्या उन्हाचे चटके बसू लागले आहेत.
मुंबईसह कोकण विभाग, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ नोंदवण्यात येत आहे. रात्रीचे किमान तापमान मात्र अद्यापही सरासरीखालीच असल्याने गारवा आहे. मात्र, त्यातही चढ-उताराची शक्यता आहे. दिवसाच्या कमाल तापमानातील वाढ आणखी चार ते पाच दिवस कायम राहणार आहे.
हेही वाचा >>> मुंबई : जे.जे.रुग्णालयात सापडला भुयारी मार्ग
राज्यात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत पावसाळी स्थिती होती. ढगाळ वातावरणामुळे दिवसाच्या तापमानात मोठी वाढ न झाल्याने ‘ऑक्टोबर हीट’ची वातावरणीय प्रणाली यंदा गायब झाली. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात बहुतांश भागात रात्रीच्या तापमानात घट होऊन थंडी अवतरली होती. मात्र नोव्हेंबरचा प्रारंभ कोरडय़ा हवामानाच्या स्थितीत झाला. त्यामुळे दिवसाच्या कमाल तापमानात वाढ सुरू झाली. रात्रीचे किमान तापमान सध्या सर्वत्र १-२ अंशांनी सरासरीखाली आहे. त्यामुळे रात्री गारवा आहे. औरंगाबाद, पुणे, नाशिक आदी भागांमध्ये राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद होत आहे. दुसऱ्या बाजूला दिवसाचे कमाल तापमान मात्र वाढत आहे.
हेही वाचा >>> आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “शिवसेना फुटीला उद्धव ठाकरे आणि मी…”
डहाणूत उच्चांक..
मुंबईसह संपूर्ण कोकण विभागात सर्वत्र दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत १.५ ते २.५ अंशांनी वाढून ३५ अंश सेल्सिअसच्याही पुढे गेले आहे. शुक्रवारी राज्यातील उच्चांकी तापमान डहाणू येथे ३५.९ अंश नोंदविले गेले. मुंबईत ३५.०, सांताक्रुझ ३५.८, तर रत्नागिरी येथे ३५.४ अंश कमाल तापमानाची नोंद झाली.
येत्या काही दिवसांत..
सध्या रात्री आकाश निरभ्र राहणाऱ्या भागांत दिवसाची उष्णता विनाअडथळा वातावरणात जाऊन किमान तापमानात घट दिसून येत आहे. मात्र, पुढील काही दिवसांत दक्षिणेकडील मोसमी पावसाच्या परिणामामुळे दिवसा आणि रात्रीही अंशत: ढगाळ स्थिती तयार झाल्यास दिवसाच्या तापमानात घट आणि रात्रीच्या तापमानात वाढ होऊ शकते.
कारण काय?
उत्तरेकडील राज्यांमध्ये अद्याप कडाक्याची थंडी अवतरलेली नाही. तेथून येणारे वारे प्रभावहीन आहेत. ईशान्येकडून दक्षिणेकडे येणाऱ्या मोसमी वाऱ्यांचा प्रभाव आहे. अशा स्थितीत राज्यात कोरडे हवामान आणि आकाश निरभ्र आहे. सूर्यकिरण विनाअडथळा जमिनीपर्यंत येत असल्याने कमाल तापमानात वाढ होत आहे.