राजस्थानमधून पाऊस बाहेर पडला असला तरी मुंबईसह राज्यातून माघारी परतण्यासाठी त्याला आणखी महिनाभरही लागू शकतो. मान्सूनच्या माघारी फिरण्याच्या तारखांमधील फरकावरून हे दिसून येते. तसेच सध्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याने पुढील तीन दिवस मुंबई कोकणात पावसाच्या सरी पडण्याचा अंदाजही वेधशाळेने व्यक्त केला आहे.
जूनच्या पहिल्याच आठवडय़ात येऊन दोन महिने धो धो बरसणाऱ्या पावसाचा वेग गेल्या महिन्यात ओसरला. त्यातच दोन दिवसांपूर्वी राजस्थानमधून पाऊस परतल्याची घोषणा केंद्रीय हवामान विभागाने केली. त्यामुळे यावर्षी पाऊस लवकर जात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र राजस्थानहून पाऊस लवकर माघारी फिरला तरी राज्यातून तो लागलीच परत फिरण्याची शक्यता नाही. राजस्थान आणि मुंबईतून पाऊस मान्सून माघारी फिरण्याच्या तारखांमधील अंतर पाहिल्यास ते लक्षात येते. २००५ या वर्षांचा अपवाद वगळता इतर वेळी पाऊस सप्टेंबरच्या अखेरच्या आठवडय़ात राजस्थानमधून बाहेर पडला आहे. मुंबईतून बाहेर पडण्यासाठी पावसाने त्यानंतर साधारण २० ते ३० दिवसांचा अवधी घेतला आहे. २००५ मध्ये मात्र तो खूपच आधी म्हणजे २ सप्टेंबर रोजी राजस्थानमधून बाहेर पडला मात्र त्यानंतर तो रेंगाळला आणि १० ऑक्टोबर रोजी तो महाराष्ट्रातून बाहेर पडल्याचे जाहीर झाले. राजस्थानमधून पावसाने ९ सप्टेंबर रोजी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. मात्र गेल्या चार दिवसात श्रीगंगानगर, बिकानेर, बारमेरपर्यंतच त्याची सीमा राहिली आहे. ‘राज्यात साधारण ३० सप्टेंबरपर्यंत पाऊस सक्रीय राहतो. राजस्थानमधून पाऊस लवकर बाहेर पडला असला तरी राज्यात तो कधीपर्यंत राहील ते आताच निश्चितपणे सांगता येणार नाही,’ असे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर म्हणाले.
दरम्यान, पश्चिम किनारपट्टीवर पावसाला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार सरींचाही इशारा देण्यात आला आहे. बुधवारी संध्याकाळी कुलाबा येथे २५ मिमी पावसाची
नोंद झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा