उन्हाळ्याच्या सुट्टीच्या निमित्ताने मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने रेल्वेने या सुट्टीच्या दिवासामध्ये ३८ विशेष गाडय़ा सोडणार असल्याचे जाहिर केले आहे. त्यापैकी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या सर्व १९ गाडय़ा आरक्षण सुरू होताच पहिल्याच दिवशी गर्दीने ओसंडून गेल्या आहेत. शुक्रवारी पहिल्याच दिवशी या गाडय़ांच्या आरक्षणासाठी ठिकठिकाणच्या आरक्षण केंद्रांवर रांगा लागल्या, तर घरोघरी संगणकावर आरक्षण करण्यासाठी चाकरमान्यांची गडबड उडाली. पहिल्याच दिवशीच्या या गर्दीमुळे उन्हाळी सुट्टीत कोकणाकडे जाणाऱ्या विशेष गाडय़ाही कमी पडणार, अशी चिन्हे दिसत आहेत.
    मुंबईतून कोकणात जाण्यासाठी १९ आणि कोकणातून मुंबईत परत येण्यासाठी १९ अशा ३८ विशेष गाडय़ा सोडण्याची घोषणा कोकण रेल्वेने काही दिवसापुर्वी केली होती. त्यानुसार आठवडय़ातून तीन दिवस या गाडय़ा सोडल्या जाणार आहेत. पण त्यांचे आरक्षण शुक्रवारी १९ एप्रिलला सुरू करण्यात आले होते. पण अवघ्या एका दिवसातच कोकणात जाणाऱ्या सर्व गाडय़ांचे आरक्षण फुल झाले असल्याचे रेल्वे सुत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे नेहमीच्याही सर्व जाणाऱ्या-येणाऱ्या गाडय़ांचेही आरक्षण फुल आहे. त्यामुळे आजमितीला जवळपास प्रतिक्षायादी ही ३५० पर्यंत पोहचली आहे. अशा स्थितीत रेल्वेने आणखी जादा गाडय़ा सोडाव्यात अशी मागणी होत आहे.
इंटरनेटद्वारे रेल्वे आरक्षणाची सुविधा उपलब्ध असली, तरी उपलब्ध तिकिटांची संख्या संपल्यानंतरच इंटरनेटची गती वाढते आणि प्रतीक्षा यादीच दिसू लागते, त्यामुळे संगणकाद्वारे आरक्षणाचे फायदे प्रवाशांना मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. याप्रकरणी दलालांची भूमिकाही तपासावी, अशीही मागणी वाढली आहे. दरम्यान, रेल्वेगाडय़ांची गर्दी वाढू लागताच अनेक चाकरमान्यांचे मोर्चे एस.टी.कडे वळल्याने मुंबई सेंट्रल, परळ येथील एस.टी. स्थानकांवर आरक्षणाकरिता मुक्काम ठोकून नंबर लावणाऱ्यांची गर्दी दिसू लागली आहे. शिवाय, गोवा मार्गावरून धावणाऱ्या खाजगी प्रवासी वाहनांचा भावही वधारला आहे.

Story img Loader