Owner Of Laxmi Nivas Bungalow: मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित मालमत्तांपैकी एक असलेल्या नेपियन सी रस्त्यावरील लक्ष्मी निवास बंगल्याची तब्बल २७६ कोटी रुपयांना विक्री झाली आहे. स्थापत्य भव्यतेव्यतिरिक्त, लक्ष्मी निवास बंगल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. कारण ते स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यसैनिकांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण होते.
Zapkey.com ने मिळवलेल्या आणि इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, लक्ष्मी निवासची विक्री २८ फेब्रुवारी २०२५ रोजी पूर्ण झाली. १९,८९१ चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या बंगल्याची विक्री किंमत अंदाजे १.३८ लाख रुपये प्रति चौरस फूट इतकी आहे, जी मुंबईच्या उच्च रिअल इस्टेट बाजारपेठेची साक्ष आहे. या मालमत्तेत तळमजला, दोन वरचे मजले आणि मागील बाजूस एक अतिरिक्त वास्तू आहे.
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत या इमारतीचे विशेष स्थान आहे, कारण स्वातंत्र्यापूर्वी, १९४० च्या दशकाच्या सुरुवातीला अनेक महत्त्वाच्या स्वातंत्र्यसैनिकांसाठी ती सुरक्षित ठिकाण होते.
लक्ष्मी निवासचे नवे मालक कोण?
या लक्ष्मी निवास बंगल्याचे मालक असलेल्या कपाडिया कुटुंबाने १९,८९१ चौरस फूटाचा हा बंगला मुंबईस्थित वागेश्वरी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडला विकला आहे. एका वृत्तानुसार, या कंपनीच्या संचालकांमध्ये अलिना निखिल मेसवानी यांचा समावेश आहे. अलिना या निखिल आर मेसवानी यांची पत्नी आहेत. निखिल हे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक आहेत.
कोण आहेत निखिल मेसवानी?
५९ वर्षीय निखिल मेसवानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये एक महत्त्वाच्या पदावर आहेत. १९८६ मध्ये ते रिलायन्स समूहात सामील झाले होते. ते १ जुलै १९८८ पासून रिलायन्सच्या संचालक मंडळात काम करत आहेत. रिलायन्स समूहाच्या पेट्रोकेमिकल्स, रिफायनिंग आणि मुंबई इंडियन्स आयपीएल फ्रँचायझी आणि इंडियन सुपर लीग (आयएसएल) यांचा समावेश असलेल्या क्रीडा गुंतवणुकीत निखिल मेसवानी महत्त्वाची भूमिका बजावतात.
अंबानी-मेसवानी यांच्यातील नाते
मेसवानी यांचे अंबानींशी कॉर्पोरेटशिवाय घरगुती संबंधही आहेत. निखिल मेसवानी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संस्थापक संचालकांपैकी एक आणि धीरूभाई अंबानी यांची मोठी बहीण त्रिलोचना यांचे पुतणे रसिकलाल मेसवानी यांचे पुत्र आहेत.
निखिल यांचे धाकटे भाऊ हितल मेसवानी हे देखील रिलायन्समध्ये उच्च पदावर आहेत. ते १९९५ पासून कंपनीच्या संचालक मंडळावर आहेत.