लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत भाड्याच्या घरांच्या नोंदणीत सतत वाढ होत असून त्याच वेळी घरांच्या विक्रीलाही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. भाड्यांच्या घरांची मागणी वाढण्यामागे मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू असलेला पुनर्विकास हे कारण असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मुंबई नेहमीच आघाडीवर

देशातील आठ शहरांपैकी नेहमीप्रमाणे भाड्यांच्या घरांच्या नोंदणीतील वाढीसह मुंबई घरविक्रीतही आघाडीवर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या तिमाहीत मुंबईत घरविक्रीत पाच टक्के तर पुण्यात २० टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘नाईट फ्रँक’ या आंतरराष्ट्रीय संशोधन कंपनीने ‘निवासी आणि कार्यालयां’बाबतचा तिमाही अहवाल एका वार्ताहर परिषदेत प्रसिद्ध केला. मुंबईसह एनसीआर, बंगळुरु, पुणे, हैदराबाद, अहमदाबाद, कोलकता आणि चेन्नई या आठ शहरांतील घरविक्रीचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे.

भाड्याच्या घरांना मागणी

मुंबईत जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीत भाड्याच्या घरांसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगलीच मागणी असल्याचे निष्पन्न झाले. नोंदणी विभागाकडे गेल्या दोन वर्षांपासून भाड्याच्या घरांची नोंदणी वाढत असल्याचे दिसून येते. गेल्या काही महिन्यांमध्ये झालेली वाढ ही मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या पुनर्विकास प्रकल्पांमुळे असल्याचे सांगण्यात आले. घरांच्या भाड्यात गेल्या काही महिन्यांत ३० टक्के वाढ झाल्याचा दावाही करण्यात आला आहे.

सहा टक्के वाढ

जानेवारी ते मार्च या नव्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत घरविक्रीत मुंबई आघाडीवर असून २४ हजार ९३० घरांची विक्री झाली तर २५ हजार ७०६ इतक्या नव्या घरांची घोषणा करण्यात आली. पुण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के घरे (१४ हजार २३१) अधिक विकली गेली तर २२ टक्के (१६ हजार २३१) नव्या घरांची घोषणा करण्यात आल्याचेही या अहवालात नमूद आहे. आठ शहरात विक्री झालेल्या ८८ हजार २७४ घरांपैकी २८ टक्के घरांची विक्री मुंबईत झाली आहे. या आठ शहरात येऊ घातलेल्या ९६ हजार ३०९ घरांपैकी २४ टक्के घरे मुंबईत असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मुंबई आणि पुण्यातील घरांच्या किमतीत सहा टक्के वाढ झाल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

विकासकांसाठी आशादायक!

घरांच्या वाढत चाललेल्या किमती ही चिंतेची बाब बनत चालली आहे. रेडी रेकनरमधील वाढीमुळेही घरांच्या किमतीत वाढ होणार आहे. तरीही मुंबई, पुण्यासारख्या शहरात घरांच्या विक्रीत झालेली वाढ विकासकांसाठी आशादायक आहे, अशी प्रतिक्रिया नाईट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी व्यक्त केली.

जानेवारी-मार्च २०२५ मधील मुंबईतील घरविक्री (किमतीसह)

५० लाखांपर्यंत – १०,१२१; ५० लाख ते एक कोटी : ६,२४४; एक ते दोन कोटी : ४,८६५; दोन ते पाच कोटी : २,९५०; पाच ते दहा कोटी : ५५७; दहा ते २० कोटी : १०७; २० ते ५० कोटी : ६५ आणि ५० कोटीहून अधिक : २१.