मुंबई : शहरातील सुमारे १० हजार परवानाधारक खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न स्वच्छतेच्या पद्धती, अन्नपदार्थांची सुरक्षित हाताळणी आणि साठवणूक प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. यासाठी पालिका व भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण यांच्यात सोमवार, २३ डिसेंबर रोजी सामंजस्य करार करण्यात आला. याअंतर्गत खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अन्न सुरक्षेचे महत्त्व, वैयक्तिक स्वच्छता, विक्रीच्या ठिकाणची स्वच्छता आणि सज्जता, अन्न शिजवणे किंवा पाककृती करणे, कचरा व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाची माहिती सोबतच प्रभावी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ विक्रेते प्रत्येक गल्लोगल्ली असतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खवय्यांची गर्दीही असते. मात्र अशा खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर स्वच्छता नसेल तर ग्राहकांच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा खाद्यपदार्थ विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महानगरपालिका आयुक्त सभागृहात महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. कमलवर्धन राव यांनी सामजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. यावेळी संस्थेच्या पश्चिम विभागाच्या संचालक प्रीती चौधरी, सहसंचालक डॉ. के. यू. मेथेकर यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यावेळी म्हणाले की, सर्वसामान्य मुंबईकरांच्या आरोग्यासाठी खाद्य विक्रेत्यांना प्रशिक्षण देणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. खाद्यपदार्थ विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्याकामी महानगरपालिका सर्वोतोपरी सहकार्य करेल. मुंबईतील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी नागरिकांना स्वच्छ, ताजे अन्न पुरवावे, यासाठी परवानाधारक खाद्य विक्रेत्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचा फायदा खाद्यविक्रेत्यांनी घ्यावा. या प्रशिक्षणामुळे मुंबईकरांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी मदत मिळणार आहे. व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छतेची खबरदारी घेतल्यामुळे नागरिकांना गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थ उपलब्ध होतील. या सामंजस्य करारानुसार, मुंबई महानगरपालिका आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यामाने वर्षभर नियमित अंतराने प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.