Mumbai Local Accident : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. कधी पाऊस-पाण्यामुळे लोकल उशिरा धावतात तर कधी तांत्रिक बिघाडामुळे ट्रेनला उशीर होतो. परिणामी प्रवाशांना जीवघेण्या गर्दीतून प्रवास करावा लागतो. हाच प्रवास त्यांच्या जिवानीशीही जातो. असाच प्रकार आता समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चालत्या ट्रेनमधून एक व्यक्ती अगदी डोळ्यांदेखत पडला, पण त्याला वाचवण्याकरता जाण्याचीही उसंत कोणाला मिळाली नाही.
मुंबई लोकलमधील प्रवासी दिवसेंदिवस वाढत जात आहेत. पुरुष आणि महिला प्रवाशांमध्ये सातत्याने वाढ होतेय. मध्य रेल्वेवर ठाण्याच्या पलिकडे, पश्चिम मार्गावर वसई-विरारपर्यंत अन् हार्बर मार्गावर पनवेलपर्यंत मुंबई विस्तारली गेली आहे. त्यामुळे नोकरीच्या निमित्ताने मुंबई शहरात येणाऱ्या प्रवाशांना ट्रेनशिवाय सोयीचा पर्याय नाही. मेट्रो आणि रस्ते वाहतूक असली तरीही तुलनेने ट्रेनचाच पर्याय सर्वांना सोयीचा वाटतो. परिणामी लोकलवरील ताण वाढत जाऊन अपघाताचं (Mumbai Local Accident) प्रमाण वाढत जातंय.
हेही वाचा >> Mumbai Local Accident : मुंबईत रुळांवरून लोकल ट्रेन थेट चढली प्लॅटफॉर्मवर अन् लोकांनी मारल्या उड्या…; अपघाताच्या थरारक घटनेचा Video कधीचा? वाचा सत्य घटना
सोशल मीडियामधील व्हिडिओमध्ये काय दिसतंय?
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडिओमध्ये काही प्रवासी बंद दरवाजाच्या बाहेर असलेल्या छोट्याश्या पोकळीत उभे राहून प्रवास करत होते. एकाच दरवाज्यावर जवळपास चार प्रवासी लटकत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या लोकलच्या बाजूने एक एक्स्प्रेस जात असून एक्स्प्रेसमधील काही प्रवाशांनी भरगच्च भरलेल्या लोकलचा व्हिडिओ काढला. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की एक व्यक्ती दरवाज्यावर लोंबकळत असताना प्रवासी व्हिडिओकडे बघण्याच्या नादात समोरच्या खांबाला धडकून खाली पडला (Mumbai Local Accident). त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या प्रवाशाला याची खबर लागण्याआधीच ट्रेन वेगाने पुढे निघून गेली. त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यापलिकडे सहप्रवाशांना काहीही करता आलं नाही.
दरम्यान या अपघाताबाबत (Mumbai Local Accident) मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी स्वप्निल निला यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, “हा व्हिडिओ जुना असून २०२२ सालचा आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण मार्गावर हा अपघात घडला. हा अपघातग्रस्त व्यक्ती जीवित असून त्याच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं. या लोकलच्या शेजारून जाणाऱ्या डेक्कन क्वीनमधील प्रवाशांनी हा अपघात त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केला होता.”
हेही वाचा >> Mumbai Local Stunt: मुंबईत लोकलला लटकून तरुणाचा जीवघेणा स्टंट, व्हिडीओ व्हायरल
व्हायरल होणारा व्हिडीओ जुना असला तरी त्यातून दिसणारं सत्य कायम असून लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. (Mumbai Local Accident)
To run family we need Job, To save Job , have to attend office in time, To attend office we have to catch Train, To catch daily late , Overcrowded trains we have to risk our life . Family is more important than LIFE and for @RailMinIndia Mails and Express are important Than Lives pic.twitter.com/tvlloMwoI9
— मुंबई Mumbai Rail Pravasi Sangha (@MumRail) July 25, 2024
रेल्वेवर ताण वाढला अन् नियोजन फसलं
दरम्यान, २०२४ च्या पहिल्या तिमाहित मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील मध्य आणि पश्चिम मार्गावर ५६५ प्रवाशांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये पडून जीव गमावलेल्या प्रवाशांची संख्या १३९ आहे. मुंबई आणि आसपासच्या नगरातील ८० उपनगरीय रेल्वे स्थानकातून दिवसाला ४० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत असतात. सातत्याने वाढणाऱ्या प्रवाशांचा ताण लोकलवर पडत असून रेल्वे नियोजन हाताबाहेर गेल्याचं अशा अपघातांतून (Mumbai Local Accident) स्पष्ट होत आहे.