Mumbai Railway Stations Under Amrit Bharat Station Scheme: भारतीय रेल्वेने देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत (ABSS) स्थानकांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (६ ऑगस्ट) ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुर्नविकासाच्या कामांची पायाभरणी केली. या संदर्भात, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ABSS अंतर्गत १५ स्थानकांचे रूप पालटणार असल्याची माहिती दिली आहे. मुंबई विभागातील अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत बदलण्यात येणाऱ्या रेल्वे स्थानकांची यादी तसेच या स्थानकावर कोणते बदल होणे अपेक्षित आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊया…
प्राप्त माहितीनुसार रेल्वेने रेल्वे वापरकर्ते, प्रवासी वापरकर्ते संघटना आणि स्थानकावरील विविध सेवा प्रदात्यांकडून विशिष्ट स्थानकावरील आवश्यकतांबद्दल त्यांचे मत सुचवण्यासाठी अभिप्राय मागवले होते. एका निवेदनात, झोनल रेल्वेने, “१५ ऑगस्ट २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी @drmmumbaincr वर ईमेल आयडी किंवा TwitterHastagas वर स्थानकांवर आवश्यक सुविधांच्या सुधारण्यासाठी सूचना द्याव्यात.” असे सांगितले होते. तसेच कामाच्या टप्प्यावर आधारित सूचनांचा रेल्वेतर्फे विचार करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.
अमृत भारत योजनेअंतर्गत मुंबईतील ‘या’ स्थानकांचं रूप बदलणार
- भायखळा
- चिंचपोकळी
- परळ
- माटुंगा
- कुर्ला
- विद्याविहार
- विक्रोळी
- कांजूरमार्ग
- मुंब्रा
- दिवा
- शहाड
- टिटवाळा
- इगतपुरी
- वडाळा रोड
- सँडहर्स्ट रोड
अमृत भारत स्टेशन योजना (ABSS) अंतर्गत रेल्वे स्थानकांवर कोणते बदल होणार?
- आवश्यक तेथे अतिरिक्त FOB (फूट ओव्हर ब्रिज) ची तरतूद.
- लिफ्ट आणि एस्केलेटरची तरतूद.
- सर्क्युलेटिंग एरिया आणि ट्रॅफिक प्लॅन सुधारणे
- वेटिंग हॉल आणि स्वच्छतागृहांमध्ये सुधारणा
- स्टेशनच्या दर्शनी भागात सुधारणा
- स्थानकांवर प्रकाश व्यवस्था सुधारणे
- विविध चिन्हांची तरतूद
- ट्रेन इंडिकेटर बोर्डची सुधारणा
- कोच इंडिकेटर बोर्डची तरतूद
- वाहन पार्किंग वाढवणे
- प्लॅटफॉर्मवरील छप्पर विस्तार