वर्षाचा शेवटचा संपूर्ण रविवार मध्य रेल्वेच्या मार्गावरील मुंबईकरांना ‘महा मेगाब्लॉक’मुळे लोकलमध्ये घालवावा लागल्यानंतर आज (सोमवार) आठवड्याची सुरूवातही मनस्तापाने झाली आहे. ठाणे रेल्वे यार्डाचे आधुनिकीकरण, रेल्वे क्रॉसिंगचे नूतनीकरण आणि कल्याण ते ठाणे दरम्यानच्या पाचव्या सहाव्या मार्गाचे विद्युतीकरण यातील बदलांसाठी शनिवारच्या रात्रीपासून सुरू झालेला ‘महा मेगाब्लॉक’ संपता संपत नाहिए, त्यामुळे ठाणे, कळवा आणि मुंब्रा येथील प्रवासी आणि चाकरमान्‍यांचे प्रचंड हाल झाले. काल रात्री काम उशीरा संपल्‍यामुळे लोकल गाड्या अर्धा ते पाऊण तास उशीराने धावत आहेत. दरम्यान रेल्‍वेची वाहतूक दुपारी १ वाजेपर्यंत सुरळीत होण्‍याची अपेक्षा मध्य रेल्‍वेने व्‍यक्त केली आहे.  
ठाणे रेल्वे यार्डाचे आधुनिकीकरण, रेल्वे क्रॉसिंगचे नूतनीकरण आणि कल्याण ते ठाणे दरम्यानच्या पाचव्या सहाव्या मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पहाटे २ वाजता संपणे अपेक्षित होते. परंतु, हे काम संपायला ४ वाजले. त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली असून सर्व गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. दरम्यान, या मार्गावरुन दर एक तासाने लोकल सोडल्या जात असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. ठाण्याहून सीएसटीच्या दिशेने जाणा-या अनेक लोकल रद्द केल्याने ठाणे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे.