धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग करून तीन दिवस फरारी असलेल्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी अखेर सोमवारी दुपारी ग्रँट रोड स्थानकात अटक केली. त्यानंतर या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाने लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. लोहमार्ग पोलीस या आरोपीची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, पीडित तरुणी तक्रार दाखल करण्यासाठी अद्याप पुढे आली नसून तिने या आरोपीला ओळखणे गरजेचे आहे.
गुरुवारी रात्री एक तरुणी चर्चगेटला येण्यासाठी मालाडहून महिलांच्या डब्यात प्रवास करत होती. त्या वेळी ग्रँट रोड स्थानकात एक तरुण या डब्यात शिरला. त्याने या तरुणीचा विनयभंग केला. या तरुणीने प्रसंगावधान राखून आरडाओरडा केला आणि त्यामुळे घाबरलेल्या या तरुणाने चर्नी रोड स्थानकाजवळ गाडी सिग्नलला थांबल्यावर खाली उतरून पळ काढला. पप्पू यादव (१९) हा तरुण ग्रँट रोड येथे राहणारा असून कुलाबा येथील एका बारमध्ये काम करत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली होती. पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात दुपारी बारा वाजता पप्पू सापडला आणि त्याला अटक करण्यात आली. रेल्वे सुरक्षा दलाने केलेल्या चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला. रेल्वे सुरक्षा दलाने पप्पूला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. पप्पू यादव एक वर्षांपूर्वी ओडिशाहून मुंबईत आला होता. तो कुलाबा येथील एका बारमध्ये वेटर म्हणून काम करत होता, अशी माहिती लोहमार्ग पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली. या प्रकरणात पीडित तरुणीने तक्रार केली नसली, तरी स्वत: लोहमार्ग पोलिसांनी स्वत:हून तक्रार दाखल केली होती. मात्र आता आरोपीची ओळख पटवण्यासाठी तरुणीने समोर येण्याची गरज आहे. तसे न झाल्यास इतर कलमांखाली या आरोपीवर कारवाई करावी लागेल, असे देवराज यांनी स्पष्ट केले.