Mumbai Local : मुंबई लोकल ( Mumbai Local ) म्हणजे मुंबईकरांची लाइफलाइन. मुंबईकरांचा लोकल प्रवास सुरळीत आणि सुकर व्हावा यासाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर यांच्याकडून प्रयत्न सुरु असतात. अनेकदा गर्दीच्या वेळी प्रवाशांना लोकलमध्ये चढताही येत नाही. फर्स्ट क्लास असो किंवा सेकंड क्लास लोकल पकडण्यासाठी जीव मुठीत धरावा लागतो. त्यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रवासी कायमच करत असतात. मध्य रेल्वेने ५ ऑक्टोबरपासून वेळापत्रकात काही बदल केले आहेत. तसंच प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
गर्दीच्या वेळी मुंब्रा आणि कळव्यात जलद लोकल्सना थांबा
कळवा आणि मुंब्रा येथील जलद लोकल ( Mumbai Local ) गाड्यांना थांबा मिळणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी दोन-दोन लोकल्सना ( Mumbai Local ) थांबा मिळणार आहे. नव्या वेळापत्रकाप्रमाणे ५ ऑक्टोबर २०२४ पासून थांबा मिळणार आहे. त्यामुळे या दोन स्थानकांमधल्या प्रवाशांना अंशतः दिलासा मिळाला आहे. कळवा आणि मुंब्रा या रेल्वे स्थानकातून नियमित स्वरुपात आपल्या कामानिमित्त मुंबई गाठणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. सकाळी आणि संध्याकाळी ‘ऑफिस अवर्स’मध्ये धावणाऱ्या फास्ट लोकल ट्रेन्सना ( Mumbai Local ) कळवा आणि मुंब्रा या ठिकाणी थांबा देण्यात आला आहे.
हे पण वाचा- मुंबई : मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात शनिवारपासून बदल; रात्रीच्या कसारा, कर्जत लोकल लवकर सुटणार
कोणत्या फास्ट लोकल्सना थांबा?
कळवा रेल्वे स्थानकात सकाळी ८.५६ ला अंबरानाथहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल थांबेल
मुंब्रा स्थानकात सकाळी ९.२३ ला आसनगावहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल थांबेल
कळवा स्थानकात संध्याकाळी ७.२९ ला मुंबईहून बदलापूरच्या दिशेने जाणारी जलद लोकल थांबेल
मुंब्रा स्थानकात संध्याकाळी ७.४७ वाजता मुंबईहून टिटवाळ्याच्या दिशेने जाणारी जलद लोकल थांबेल
मध्य रेल्वेचं नवं वेळापत्रक ५ ऑक्टोबरपासून
मध्य रेल्वेचं नवं वेळापत्रक ५ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातून १० अप आणि १० डाऊन लोकल ( Mumbai Local ) फेऱ्या धावतील. या बदलामुळे सध्याच्या लोकलला होणारा विलंब टाळता येणे शक्य होणार आहे. ५ ऑक्टोबरपासून शेवटची कसारा, कर्जत लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना धावपळ करावी लागण्याची चिन्हे आहेत. तसेच सीएसएमटीवरून सुटणाऱ्या २२ जलद अप आणि डाऊन लोकल दादरवरून सोडण्यात येणार आहेत. परिणामी, सीएसएमटी, भायखळा येथील प्रवाशांचे हाल होणार आहेत.
लांब पल्ल्याची शेवटची गाडी पकडण्यासाठी प्रवाशांना करावी लागणार धावपळ
मध्य रेल्वेवरील लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या सुधारित वेळेनुसार लोकल सेवांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. सीएसएमटी – कसारा लोकल ( Mumbai Local )दररोज रात्री १२.१४ वाजता, तर सीएसएमटी – कर्जत लोकल दररोज रात्री १२.२४ वाजता सुटते. मात्र, ५ ऑक्टोबरपासून सीएसएमटी – कसारा लोकल रात्री १२.०८ वाजता, तर सीएसएमटी – कर्जत लोकल रात्री १२.१२ वाजता सोडण्यात येणार आहे. या लोकल अनुक्रमे ६ आणि १२ मिनिटे आधीच सुटणार आहेत. त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कसारा, कर्जत लोकल पकडण्यासाठी थोडी धावपळ करावी लागणार आहे.