Mumbai Local Passenger Fire: मुंबई लोकलमधील एक अत्यंत धक्कादायक प्रकार सध्या समोर येत आहे. अपंगाच्या डब्यामध्ये एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाला चक्क जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात सदर प्रकार घडला. शनिवारी रात्री ११:३० वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे समजतेय. प्राप्त माहितीनुसार, प्रमोद वाडेकर (वय 35) असं या अपंग प्रवाशाचं नाव आहे. नेमकं त्या रात्री प्रवासात काय घडलं जाणून घेऊया..
प्रमोद वाडेकर हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या लोकलमध्ये अपंग प्रवाशांच्या डब्यातून प्रवास करत होता. ही लोकल कळवा मुंब्रा स्थानकाच्या मध्ये येताच एका गर्दुल्यासह प्रमोद यांचा वाद सुरु झाला. वाद काहीच क्षणात विकोपाला जाऊन गर्दुल्ल्याने चक्क रुमालाला आग लावून तो रुमाल या प्रमोद यांचं अंगावर फेकला. या घटनेत प्रमोद हे गंभीर जखमी झाले होते.
मीडिया रिपोर्टनुसार त्यांना कळव्याच्या छत्रपती रुग्णालयात नेले असता तिथे उपचाराची सोय नसल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धक्कादायक बाब अशी की सदर प्रकार रात्री ११.३० च्या सुमारास घडून उपचारासाठी बेड मिळेपर्यंत प्रमोद यांना तब्बल १२ तास वाट पाहावी लागली .
दरम्यान, ठाणे लोहमार्ग पोलीस व रुग्णालयातील अधिकाऱ्यानीं दिलेल्या माहितीनुसार, सध्या जखमी प्रवासी प्रमोद यांच्यावर उपचार सुरु आहेत तर दुसरीकडे घटनास्थळावरून पळून गेलेल्या आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३२६ (स्वैच्छिकपणे धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनी गंभीर दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.