मध्य रेल्वेवर तब्बल ५० ठिकाणी ओव्हरहेड वायर झिजली असल्याने ही वायर तुटून शुक्रवारी जशी वाहतूक विस्कळीत झाली तसेच संकट यापुढेही वारंवार ओढवण्याची शक्यता आहे.
झिजलेल्या या वायर दुरुस्तीसाठी गरजेची साधनसामुग्रीच मध्य रेल्वेकडे नसल्याने ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड होण्याची किंवा ती तुटण्याची शक्यता जास्त आहे. मध्य रेल्वेवर देखभाल दुरुस्तीसाठीच्या साधनांचा अभाव असल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र शुक्रवारच्या घटनेने या अभावाचे गांभीर्य वाढले आहे. उपनगरी गाडय़ांना विद्युतपुरवठा करणाऱ्या या वायरची जाडी साधारण १५ मिलीमीटर एवढी असते. पेण्टोग्राफ आणि ओव्हरहेड वायर यात वारंवार होणाऱ्या घर्षणामुळे या वायर झिजतात. मात्र त्या जास्त झिजल्यास तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे काही काळाने त्या बदलण्याची वा दुरुस्त करण्याची गरज पडते.
सध्या मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर तब्बल ५० ठिकाणी अशा प्रकारे ओव्हरहेड वायरची जाडी कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मात्र सामग्री अभावी त्यांची दुरुस्ती शक्य नसल्याने भविष्यात हे प्रकार वाढण्याची शक्यताही त्याने वर्तवली.

Story img Loader