* पश्चिम रेल्वे तासभर ठप्प
* हार्बरवरही गोंधळ
* प्रवाशांचे प्रचंड हाल
सांताक्रूझ स्थानकाजवळ विद्युत प्रवाहात अचानक बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची चर्चगेट ते विरार दरम्यानची वाहतूक रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एक तासाहून अधिक काळ बंद पडल्याने हलकल्लोळ माजला. त्याच काळात मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते अंधेरी दरम्यानची वाहतूकही विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. बेस्टने प्रवाशांच्या सोयीसाठी वांद्रे आणि अंधेरी येथून जादा बसगाडय़ांची व्यवस्था केली होती. रात्री उशीरा वाहतूक पूर्ववत झाल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीचा घोळ सुरूच होता.
रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी सिग्नल यंत्रणेला विद्युत पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत अचानक बिघाड झाला आणि सर्व सिग्नल्स बंद पडले. सर्वच मार्गावरील सिग्नल्स लाल झाले. तसेच ओव्हरहेड तारांमधील विद्युतप्रवाहही खंडीत झाला. यामुळे उपनगरी गाडय़ा जागीच उभ्या राहिल्या.
तांत्रिक बिघाड असल्याचे गाडय़ांमध्ये तसेच स्थानकांमध्ये जाहीर करण्यात येत असले तरी हा बिघाड नेमका कधी दूर होईल, हे कळत नसल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. तांत्रिक बिघाड १५ ते २० मिनिटांत दूर होऊन वाहतूक पूर्ववत होईल, असे सांगण्यात येत होते. तथापि, अर्धा तास उलटून गेल्यावरही गाडय़ा सुरू होण्याची चिन्ह दिसत नव्हती. त्यातच हार्बर मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली. वडाळा रोड ते अंधेरी दरम्यानची वाहतूकही पूर्णपणे बंद झाली होती. रात्री ९.४० नंतर वाहतूक पूर्ववत झाल्याचे पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नितीन डेव्हिड यांनी सांगितल असले तरी प्रत्यक्षात रात्री साडेदहा वाजेपर्यंत गाडय़ा सुरू झाल्या नव्हत्या.
चर्चगेट ते विरार मार्गावरील सर्वच विद्युत यंत्रणा बंद झाल्याने गाडय़ांच्या रांगा लागल्या होत्या. गाडय़ा जागीच उभ्या राहिल्यामुळे अनेक प्रवाशांनी गाडीतून उतरून अंधारात नजीकचे स्थानक गाठण्याचा प्रयत्न केला.
दादर, चर्चगेट, वांद्रे, अंधेरी, बोरिवली आदी स्थानकांमध्ये प्रवाशांची मोठया प्रमाणात गर्दी उसळली होती. बेस्टने वांद्रे, अंधेरी येथील आगारातून जादा बसगाडय़ा सोडल्या मात्र तरीही प्रवाशांची गर्दी रात्री उशीरापर्यंत कमी झालेली नव्हती.

 

Story img Loader