मध्य रेल्वेने गोंधळाचा खेळ कायम ठेवण्याची परंपरा बुधवारीही जपली. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास टिटवाळा आणि आंबिवली यांदरम्यान रेल्वे रूळाला तडा गेल्याने वाहतूक तासभर खोळंबली होती. तर संध्याकाळी सहाच्या दरम्यान कुर्ला ते माटुंगा यांदरम्यान चारही मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने चारही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
सकाळी टिटवाळा आणि आंबिवली या स्थानकांदरम्यान अप मार्गावरील रूळाला तडा गेला. सकाळी ८.०५ वाजता घडलेल्या या घटनेमुळे तीन लांब पल्ल्याच्या गाडय़ा रखडल्या. तसेच आठ उपनगरीय सेवा रद्द करण्यात आल्या. संध्याकाळी ५.५०च्या सुमारास कुर्ला ते माटुंगा यांदरम्यान चारही मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. या मार्गावरील सर्व सिग्नल लाल दिवे दाखवू लागले होते. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू होती.